शाळेचे दिवस आठवले की आजही मन एकदम पाठीमागे निघून जातं. आपण आयुष्यात कितीही मोठे झालो, तरी काही शिक्षकांची जागा मनात कायम हक्काची राहते. माझ्यासाठी असेच एक गुरुजी म्हणजे आमचे शरद पाटील सर. तसे सर आम्हाला ६ वी आणि ७ वी मध्ये वर्गशिक्षक म्हणून लाभले होते, पण ५ वी च्या वर्गात पाऊल ठेवल्यापासून ते थेट १० वी च्या निरोपाच्या समारंभापर्यंत सरांनी आम्हाला शिकवलं. आमच्या संपूर्ण शालेय जीवनाचा प्रवास सरांच्याच छत्रछायेत झाला. आज सरांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटला.
पाटील सर म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो त्यांचा तास आणि त्यांचा कडक पण कमालीचा प्रेमळ स्वभाव. विज्ञान आणि गणित हे विषय म्हणजे ग्रामीण भागातल्या आम्हा मुलांसाठी तशी डोकेदुखीच! पण सरांची शिकवण्याची पद्धत एवढी सोपी होती की, अवघडातलं अवघड गणित सुद्धा डोक्यात चटकन बसायचं. पाठांतर करण्यापेक्षा संकल्पना समजून घेणं किती महत्त्वाचं असतं, हे सरांनीच आम्हाला गणिताच्या सूत्रांमधून आणि विज्ञानाच्या प्रयोगांमधून शिकवलं. ५ वी ते १० वी च्या या संपूर्ण प्रवासात आमचा अभ्यासाचा पाया जर कोणी भक्कम केला असेल, तर तो पाटील सरांनीच!
सर फक्त वर्गात फळ्यावर शिकवणारे शिक्षक नव्हते. वर्गाबाहेर मैदानात उतरले की ते आमचे मित्र व्हायचे. खो-खो आणि कबड्डीच्या मॅचेसमध्ये सरांचा उत्साह बघण्यासारखा असायचा. कसं खेळायचं, प्रतिस्पर्ध्याला कसं हरवायचं आणि समजा हरलो, तर खचून न जाता पुन्हा कसं जिद्दीने उभं राहायचं, हे सरांनी खेळातून आमच्या गळ्यात उतरवलं.
त्यातही MCC (महाराष्ट्र छात्र सेना) चे दिवस तर आम्ही कधीच विसरू शकत नाही. तो खाकी ड्रेस, ती टोपी आणि कॅनव्हासचे बूट घालून जेव्हा आम्ही मैदानात उभे राहायचो, तेव्हा एक वेगळाच रुबाब असायचा. सरांच्या एका खंबीर आवाजात आमची परेड सुरू व्हायची. लहान वयातच सरांनी जी शिस्त आणि वक्तशीरपणा आमच्यात रुजवला, त्यामुळेच आज आम्ही आयुष्यात यशस्वीपणे उभे आहोत.
६ वी च्या वर्गातली एक आठवण आजही माझ्या मनात अगदी ताजी आहे. आम्ही मुलं अभ्यासात थोडे ढिले पडलो होतो. सरांनी आम्हाला रागवण्याऐवजी एक वेगळीच युक्ती केली. त्यांनी ५ वी च्या वर्गातल्या एका हुशार मुलाला आमच्या ६ वी च्या वर्गात बोलावले. तो मुलगा कसा अभ्यास करतो, त्याची वही कशी सुटसुटीत असते आणि त्याची चिकाटी कशी आहे, हे सरांनी आम्हा सगळ्या मोठ्या मुलांना दाखवून दिलं. सरांचा तो ‘लाईव्ह’ धडा आमच्या चांगलाच जिव्हारी लागला! आपल्यापेक्षा लहान मुलगा एवढा अभ्यास करतोय म्हटल्यावर आमच्यात एक प्रकारची सकारात्मक स्पर्धा सुरू झाली. मुलांवर संस्कार करण्याची सरांची ही पद्धत खरंच ग्रेट होती.
सर, ५ वी ते १० वी पर्यंतच्या त्या अत्यंत महत्त्वाच्या वर्षांत तुम्ही माझ्यासारख्या अनेक ग्रामीण भागातील मुलांच्या स्वप्नांना पंख दिले.
तुम्ही दिलेली गणिताची गोडी, मैदानावर दिलेली ऊर्जा, MCC मधून शिकवलेली शिस्त आणि वेळोवेळी दाखवलेला योग्य मार्ग यामुळेच आज आम्ही समाजात ताठ मानेने जगत आहोत. तुम्ही आमच्यासाठी घेतलेले कष्ट आम्ही कधीच विसरू शकत नाही.
आज तुमच्या वाढदिवशी, तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो!
लाडक्या शरद पाटील सरांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!
लेखक: जोतीराम बाबु शिंदे