कोल्हापूरची मातीच मुळी वेगळी आहे. या मातीने देशाला लढवय्ये, विचारवंत, कलावंत आणि द्रष्टे नेते दिले. याच कुंभी-कासारी आणि पंचगंगेच्या कुशीत घडलेला एक असा सुपुत्र, ज्याने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की कोल्हापुरी बाणा, जिद्द आणि माणुसकी काय असते. आज जेव्हा आपले लाडके पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) आपल्यातून निघून गेले आहेत, तेव्हा एका कोल्हापूरकर म्हणून मन अभिमानाने भरून येतंय आणि तितक्याच तीव्रतेने दुःखाचे उमाळेही दाटून येत आहेत.
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी आंबेप (ता. हातकणंगले) या छोट्याशा गावातील एका वारकरी कुटुंबात दादांचा जन्म झाला. लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचे संस्कार, नम्रता आणि सेवेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी कसबा बावडा येथील श्रीराम संस्थेच्या अध्यक्षपदापासून त्यांचा सामाजिक प्रवास सुरू झाला. पुढे पन्हाळा मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार आणि त्यानंतर त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. पण एवढी मोठी घटनात्मक पदे, प्रतिष्ठा आणि सत्ता मिळूनही दादांचे पाय कायम जमिनीवरच राहिले. कोल्हापूरचा माणूस कुठेही गेला तरी त्याच्या रक्तातली आपुलकी आणि स्वाभिमान सुटत नाही; दादांनी हेच ‘कोल्हापूरपण’ आपल्या प्रत्येक श्वासात जपलं होतं.
शिक्षणाचा आणि आरोग्याचा ‘भगीरथ’
जेव्हा ग्रामीण भागातील मुलांसाठी उच्च शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा हे एक स्वप्नच होतं, तेव्हा या कोल्हापूरकराच्या जिद्दीने ‘मी हे करून दाखवेन’ असा ध्यास घेतला. १९८३ मध्ये त्यांनी ‘ज्ञानदीप उजळू दे’ हा मंत्र जपून संस्थांची पायाभरणी केली. आज कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि पुण्यासह देशभरात पसरलेले १८० हून अधिक शैक्षणिक संस्थांचे जाळे, ८ विद्यापीठे आणि जागतिक दर्जाची रुग्णालये ही केवळ काँक्रीटच्या इमारती नाहीत; ती अशी मंदिरे आहेत जिथे लाखो गरीब व बहुजन कुटुंबांतील मुलांचे भवितव्य घडले.
ज्या हातांमध्ये एकेकाळी फी भरायला पैसे नसायचे, त्या हातांना दादांनी शिक्षणाची ढाल देऊन डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी बनवले. आज सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत, तर २५ हजारांहून अधिक कुटुंबे येथे रोजगाराचा आधार घेऊन जगत आहेत. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘डी. वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियम’ उभारून त्यांनी क्रीडा जगतातही भारताची मान उंच केली.
अथांग कारुण्याची मायबाप सावली*
दादांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अथांग माणुसकी! त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी गेलेला रुग्ण पैशांअभावी कधीच माघारी आला नाही. “अरे बाबा, तू नीट होशील,” हा त्यांचा एक आश्वासक शब्द आणि पाठीवरून फिरवलेला मायेचा हात रुग्णाला अर्धे आजारपण विसरायला लावायचा. कोल्हापूरचा कोणताही माणूस दादांच्या दारी गेला, तर त्याला कधी रिकाम्या हाताने किंवा उपाशीपोटी परतावे लागले नाही. “आपल्या कोल्हापूरचा माणूस आलाय,” असं म्हणून त्यांनी दिलेला आधार ही त्यांच्या विशाल हृदयाची जिवंत साक्ष होती.
दादा नेहमी म्हणायचे— “अहंकार हा आयुष्याचा अंत आहे, आणि अहंकाराचा अंत हेच खरे जीवन आहे.” हे वाक्य त्यांनी केवळ कागदावर ठेवले नाही, तर आयुष्यभर स्वतः जगून दाखवले. छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा विचार आणि संतांची शिकवण त्यांनी आपल्या प्रत्येक कार्यातून प्रत्यक्ष उतरवली. त्यांच्या या प्रदीर्घ सामाजिक व शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन केंद्र सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले.
एका सुवर्णयुगाचा अंत… पण विचार अमर आहेत
आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. कोल्हापूरने आज आपला एक उत्तुंग, आदरणीय आणि मायेचा छत्र असलेला ‘पालक’ गमावला आहे. आज पंचगंगा सुन्न झाली असेल आणि कसबा बावडाही पोरका झाला असेल. पण दादा, तुम्ही लावलेले ज्ञानाचे आणि रुग्णसेवेचे हे वटवृक्ष युगान्युगे लाखो आयुष्यांना अशीच सावली देत राहतील.
शिक्षणाचा सूर्य अस्ताला गेला असला, तरी त्यांनी पेटवलेले ज्ञानाचे लाखो दिवे असाच प्रकाश देत राहतील. कोल्हापूरच्या या थोर सुपुत्राला आणि लाडक्या दादांना अश्रूधारेने भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
जोतीराम बाबु शिंदे