आयुष्यात आपण कितीही पुढे गेलो, तरी ज्यांच्यामुळे आपण घडलो त्या माणसांचे उपकार आणि त्यांचा सहवास कधीच विसरता येत नाही. मी आज जिथे कुठे आहे, त्यामागे माझ्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या सर्व गुरुंच्या प्रति मनातील कृतज्ञता व्यक्त करताना ज्या एका आदराच्या व्यक्तिमत्त्वाचा चेहरा सर्वात आधी डोळ्यांसमोर उभा राहतो, ते म्हणजे आमचे यू. एस. मुळीक सर—म्हणजेच आमचे ‘मोठे मुळीक सर’.
सर आता सेवानिवृत्त झाले आहेत, पण त्यांनी वर्गात शिकवलेले धडे आणि आमच्या मनात पेरलेला आत्मविश्वास आजही तितकाच ताजा आहे.
सर आम्हाला भूमिती आणि विज्ञान भाग-१ हे विषय शिकवायचे. खरे तर हे दोन्ही विषय म्हणजे बऱ्याच मुलांसाठी भीतीचा डोंगर आणि डोकेदुखी ठरवणारे! पण मुळीक सर वर्गात आले की एका वेगळ्याच उर्जेचा संचार व्हायचा.
सर स्वभावाने खूप शांत आणि अत्यंत संयमी होते.
वर्गात कितीही गोंधळ असो किंवा एखादा विषय समजायला कितीही वेळ लागत असो, सरांचा संयम कधी सुटायचा नाही. अजिबात चिडचिड न करता, हसतमुखाने आणि शांतपणे पुन्हा समजावून सांगण्याची त्यांची पद्धत मनाला खूप भावून जायची.
सरांच्या बाबतीत दुसरं एक नवल वाटायचं—त्यांना शिकवताना पुस्तकाची फारशी गरज कधी भासलीच नाही. पुस्तकाकडे न बघता, केवळ आपल्या ओघवत्या शैलीत भूमितीचे कठीण प्रमेय फलकावर मांडणे असो किंवा विज्ञानातील क्लिष्ट नियम समजावून सांगणे असो; सरांची अभ्यासावरची पकड आणि तो शांत आत्मविश्वास पाहूनच आमची अर्धी भीती पळून जायची.
मुळीक सरांचे मूळ गाव उत्तूर. स्वतः मातीशी जोडलेले असल्यामुळे आमच्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांविषयी त्यांच्या मनात एक अथांग कळवळा आणि आपुलकी होती.
“गावाकडच्या मुलांमध्ये अफाट बुद्धिमत्ता असते, त्यांनी मागे पडता कामा नये,” हा विश्वास त्यांच्या मनात ठाम होता. म्हणूनच, फक्त पुस्तकातले विषय शिकवून ते थांबले नाहीत, तर परिस्थितीशी लढा देऊन “तुम्हीसुद्धा खूप पुढे जाऊ शकता” ही जिद्द त्यांनी आमच्या मनात रुजवली.
आज शाळा सोडून जवळपास १७ वर्षे झाली…
काळ पुढे गेला, वय बदललं, जबाबदाऱ्या वाढल्या; पण सरांसोबतचं नातं मात्र आजही तितकंच घट्ट आहे. सर आजूनही सातत्याने संपर्कात असतात. अत्यंत मायेने आणि आपुलकीने आमची विचारपूस करतात. आम्ही शिकून मोठे झालो, स्वतःच्या पायावर उभे राहिलो, याचा सरांना जो सार्थ अभिमान वाटतो… तो अभिमान, त्यांच्या डोळ्यांतील कौतुक पाहिलं की वाटतं, आयुष्यात आपण काहीतरी नक्कीच कमावलंय!
त्यांचा तोच शांत स्वभाव, तीच मायेची पाखर आणि वर्षानुवर्षं टिकून असलेली आपुलकी यामुळे सर आमच्यासाठी फक्त शिक्षक राहिले नाहीत, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पाठीशी उभे राहणारे एक छत्र बनले.
आज सर निवृत्त झाले असले, तरी त्यांनी दिलेली शिकवण, संस्कार आणि हे प्रेमाचे नाते आजही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आयुष्याच्या संघर्षात जेव्हा जेव्हा मार्ग शोधायचा असतो, तेव्हा मोठ्या मुळीक सरांनी दिलेला तो संयम आणि विश्वासच कामी येतो.
माझ्या या ऋषितुल्य, ध्येयवादी आणि माणुसकी जपणाऱ्या गुरुवर्यांना निवृत्तीनंतरचे आयुष्य उत्तम आरोग्याचे, दीर्घायुष्याचे आणि आनंदाचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सरांच्या चरणी माझे शतशः प्रणाम!
लेखक: जोतीराम बाबु शिंदे