अनेक माणसे भेटतात, येतात आणि जातात… पण काही व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या मनाच्या कोपऱ्यात कायमचे घर करून राहतात. माझ्या शालेय आयुष्यातील अशीच एक अतिशय आदरणीय आणि लाडकी व्यक्ती म्हणजे संगीता भिकाजी मगदुम मॅडम!
दिंडेवाडी हे मॅडमचं मूळ गाव. पण शाळेच्या चार भिंतींच्या आत त्या आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी एका आईसारख्याच होत्या. इयत्ता ६ वी व ७ वी मध्ये त्यांनी आम्हाला इतिहास शिकवला आणि पुढे ८ वी ते १० वी पर्यंत इतिहास आणि मराठी या दोन्ही विषयांची धुरा त्यांनीच सांभाळली. मॅडमचा स्वभाव म्हणजे शांततेचा आणि संयमाचा महासागर! वर्गात कधी कोणावर खेकसणे नाही की विनाकारण रागवणे नाही.
मॅडमच्या शिकवण्यात मराठी भाषेचा एक वेगळाच गोडवा आणि अभिजात सौंदर्य जाणवायचे. भाषेचे नियम, क्लिष्ट व्याकरण अतिशय सोप्या पद्धतीने समजवून सांगणे असो किंवा निबंध लेखनात विचारांची मांडणी कशी करावी हे शिकवणे असो—व्याकरण, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेची तयारी करून घेण्यात तर मॅडमचा हात धरू शकणारं कोणीच नव्हतं! वक्तृत्व स्पर्धेसाठी भाषण लिहून देण्यापासून ते व्यासपीठावर आवाजात कोणता चढ-उतार असावा, हे मॅडम ज्या बारकाईने आणि आवडीने तयारी करून घ्यायच्या, त्यामुळेच वक्तृत्वात आणि भाषणात अभिजीत आयरेसारखे कितीतरी उत्तम वक्ते आणि विद्यार्थी त्यांनी घडवले. त्यांनी शिकवलेल्या कविता, पाठांमधील रस आणि मराठी भाषेची ती समृद्धी आजही मनात तितकीच ताजी आहे.
शाळेत असताना एक गोष्ट नेहमी व्हायची—कधी मराठीचा किंवा इतिहासाचा अभ्यास बाकी असला, की मॅडम PT (खेळाचा) तास घ्यायच्या. एरवी खेळाचा तास दुसऱ्या शिक्षकाने घेतला की मुलांचा चेहरा पडायचा, आतून राग यायचा. पण आश्चर्य म्हणजे मगदुम मॅडमने PT चा तास घेतला तरी वर्गातल्या एकाही मुलाला कधी त्यांचा राग आला नाही. उलट त्यांच्या शांत आणि आपुलकीच्या शिकवण्यात आम्ही एवढे रंगून जायचो की वेळ कसा निघून गेला ते कळायचंच नाही. मॅडमची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी वर्गात कधीच कोणामध्ये अंतर केलं नाही. हुशार-ढ असा भेदभाव कधी त्यांच्या मनात शिवलाच नाही; वर्गातला प्रत्येक विद्यार्थी त्यांच्यासाठी अगदी समान होता.
मला अजूनही आठवतंय, ५ वी ते १० वी या पाच-सहा वर्षांत त्यांनी माझं नाव ‘जोतिबा’ असं क्वचितच उच्चारलं असेल. मलाच काय, पण वर्गातल्या प्रत्येक मुलाला त्या नेहमी ‘बाळा’ अशीच हाक मारायच्या. त्या एका ‘बाळा’ या शब्दात एवढा जिव्हाळा आणि वात्सल्य असायचं की ऐकणाऱ्याचं मन आपोआप भरून यायचं.
आज १० वी होऊन तब्बल १४ वर्षे निघून गेली… मॅडमना निवृत्त होऊनही आता १-२ वर्षे झाली असतील. पण काळाच्या या प्रवासात मॅडमचं प्रेम जराही कमी झालं नाही. आजही रस्त्यात किंवा कुठेही त्या दिसल्या, की तितक्याच मायेने जवळ घेऊन विचारतात— “कसा आहेस बाळा? काय चालू आहे? सर्व व्यवस्थित आहे ना?” हा प्रश्न ऐकला की एका क्षणात शाळेतले ते सोनेरी दिवस डोळ्यांसमोर जिवंत होतात.
१० वी मध्ये असतानाचा तो काळ आठवला की आजही अंगावर काटा येतो. संध्याकाळी ७ ते १० या वेळेत शाळेत खास अभ्यासिका असायची. रात्रीच्या त्या वेळेतही सर्व शिक्षक आणि त्यांच्यासोबत शिपाई काका स्वतः उपस्थित असायचे. मुलांनी अभ्यासात मागे राहू नये म्हणून सगळे शिक्षक स्वतःचे घरदार बाजूला ठेवून राबायचे. तो काळच वेगळा होता आणि त्या काळातली माणसंही!
मॅडम, आज तुम्ही निवृत्त झाला आहात. तुमच्या या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेनंतरचा हा काळ तुमच्यासाठी अत्यंत सुखाचा, समाधानाचा आणि उल्हासाचा जावो. तुम्ही वर्गात शिकवलेला इतिहास, मराठी भाषेची दिलेली गोडी आणि भाषेवर केलेले संस्कार तर मनात आहेतच, पण त्याहूनही जास्त जपून ठेवले आहे ते तुमचे निष्कलंक प्रेम!
मॅडम, तुम्हाला निवृत्तीनंतरच्या या नव्या प्रवासासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा! तुमचे उर्वरित आयुष्य उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अलोट आनंदाने समृद्ध राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
– जोतीराम बाबु शिंदे