जन्मानंतरच्या त्या अवघ्या पन्नास-साठ पावलांच्या लहानशा विश्वात जेव्हा आपण पहिलं पाऊल बाहेर टाकतो, तेव्हा अचानक आईचा उबदार हात सुटतो… अन् जीव घाबराघुबरा होतो. पण त्या अनोळखी जगात आपल्याला अलवार मायेनं सावरून घेणारा जो हात असतो, तो असतो एका शिक्षिकेचा. आज मागे वळून पाहताना काळजाचा ठोका चुकतो; माझ्या शालेय आयुष्याची पहिली पायाभरणी ज्या हातांनी केली, त्या दुसरं कोणी नसून आमच्या साक्षात लताबाई परसू ढेकळे होत्या!
माझं वय तेव्हा अवघं दोन-अडीच वर्षांचं. आजच्यासारख्या चकचकीत अंगणवाड्या तेव्हा नव्हत्या. गावातल्या ‘व्हळी देवाच्या’ एका साध्या-सुध्या जागेत आमची बालवाडी भरायची. पुढे ती जुनी वास्तू पडली आणि आमची शाळा स्थलांतरित झाली ‘वी. एम. केळेवाडी’च्या मोकळ्या व्हरांड्यात. तो उघडा व्हरांडाच आमच्यासाठी स्वप्नांची एक अथांग दुनिया होती.
त्या काळी गावात परिस्थिती कोणाचीच फारशी बरी नव्हती. आमचे आई-वडील असोत किंवा अख्ख्या गावातील कोणाचेही, भल्या पहाटेपासून शेतात राबायला जायचे. दिवसभर रक्ताचं पाणी केल्याशिवाय घरातली चूल पेटत नव्हती. आपल्या लहान लेकरांचे लाड पुरवायला किंवा त्यांच्या पाठीवरून हात फिरवायला कोणालाच वेळ नव्हती. अशा कठीण काळात लताबाई आमच्यासाठी फक्त शिक्षिका राहिल्या नाहीत, त्या आमची ‘दुसरी आई’ बनल्या! आमचं हसणं-रुसणं झेलणं, आमचा खाऊ सांभाळणं, इतकंच काय पण आमची अस्वच्छता स्वतःच्या हातांनी साफ करण्यापासून ते आम्हाला प्रेमाने मांडीवर घेऊन थोपटेपर्यंत… सगळं काही बाईंनीच केलं. आई शेतात अन् बाई वर्गात, पण प्रेमाच्या त्या मायेत तीळभरही फरक नव्हता.
त्या काळात शिक्षणाची सुरुवात पाटी अन् पेन्सिलने व्हायची. बाईंनीच आमची चिमुकली बोटे आपल्या हातात धरून ‘अ, ब, क, ड’ आणि ‘१, २, ३’ ची पहिली ओळख करून दिली. बाईंनी शिकवलेली ती बडबडगीते, अंकलिपीतील त्या ‘विमान’ आणि ‘शिपाई’च्या कविता आजही कानात गुंजतात. बाईंनी केवळ अक्षरांचा ओनामा शिकवला नाही, तर माणसासारखं जगण्याचे संस्कार आमच्या कोऱ्या मनावर कायमचे कोरले.
पण आनंदाचे हे सुंदर दिवस फार काळ टिकले नाहीत. आम्हाला थोडंफार समजायला लागलं आणि अचानक बातमी आली—बाईंची बदली झालीय! पिंपळगाव की दिंडेवाडी, कुठल्या तरी दूरच्या अनोळखी गावी त्या जाणार होत्या. लहान मनाला तो एका भल्या मोठ्या भूकंपासारखा धक्का होता. बाई गेल्यानंतर आमच्या बालवाडीला पुन्हा तशी माया देणाऱ्या बाई कधी मिळाल्याच नाहीत…
बाईंच्या त्या निरोप समारंभाचा दिवस आजही डोळ्यांसमोर आला की उर भरून येतो. त्या दिवशी वातावरणात एक अनामिक, गुदमरून टाकणारी उदासी होती. नेहमी हसतमुख असणाऱ्या बाईंच्या चेहऱ्यावर आज दुःखाचे ढग दाटले होते. बाई तर ढसाढसा रडत होत्याच, पण आम्ही लहान मुलं तर धाय मोकलून, हंबरडा फोडून रडत होतो. स्वतःच्या जन्मदात्या आईपासून दूर जाताना लेकरू जसं तडफडतं, तशीच अवस्था आम्हा सगळ्या लेकरांची झाली होती.
त्या निरोपाच्या दिवशी बाई आणि त्यांचे पती एक पोतं भरून खास कोल्हापुरी कुरमुरे आणि चविष्ट भडंग घेऊन आले होते. प्रत्येक लेकराच्या ओंजळीत बाईंनी तो प्रेमाचा भडंग दिला. तो फक्त भडंग नव्हता, तर एका आईने आपल्या काळजाच्या तुकड्यांना दूर जाताना दिलेला तो शेवटचा मायेचा घास होता! त्या भडंगाची चव आणि बाईंच्या हाताचा तो उबदार स्पर्श आजही आठवला, की डोळे आपोआप पाण्याने भरून येतात आणि गळा दाटून येतो.
काळाच्या ओघात वय वाढलं, जग बदललं, पण ‘लताबाई’ नावाचं ते दैवत हृदयातल्या एका हळव्या कोपऱ्यात कायमचं कोरलं गेलंय. आज मी जो काही आहे, त्यामागे बाईंनी दिलेला तो भक्कम पाया आणि त्यांनी शिंपडलेली अमाप मायाच आहे!
– जोतीराम बाबु शिंदे
मो. ८८९८९५५५९३
Comment
🏠अंगणवाडी हे शिक्षण केंद्र नसून संस्कार केंद्र आहे..
गेले कित्येक वर्षे माझी आई केळेवाडी गावी बालवाडी मध्ये मुलांना शिक्षण देण्यासाठी जात होती, केळेवाडी हे गाव अतिशय दुर्गम भागात, पायवाट सुद्धा जेमतेम, डोंगर चढण्यासाठी काठीचा आधार, त्यात पावसाळी दिवसात गवे रेडे आणि सापांची भीती असून देखील,डोळ्यासमोर भांडेबांबर-केळेवाडी 2.00 किलोमीटर अंतराचा रस्ता पार करून अंगणवाडीपर्यंत पोहचण्याचे काम माझी आई करत आली आहे.
आत्मविश्वास आणि माझ्या शाळेतील व गावातील
बालकांपर्यंत ज्ञान व संस्कार पोहोचण्याच्या जिद्दीने मी अंगणवाडी गाठत आपलं कर्तव्य पार पाडत आहे,अस आई सतत आम्हाला सांगायची.
सन १९९३ पासून बालवाडीचे ८ ते ९ वर्षे तसेच सध्या अंगणवाडीची १७ ते १८ वर्षे सतत रस्त्यानेच पायपीट करत आहे. गेली कित्येक वर्षे मुलांना संस्कार व शिक्षण देण्याचे कर्तव्य पार पडत आहे.
त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांचे एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) अंतर्गत इतर मुख्य काम बालकांचे आरोग्य, कुपोषण निवारण, मातांची काळजी आणि मुलांना पूर्व-प्राथमिक शिक्षण देणे हे आहे.
तसेच महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या सुद्धा प्रामाणिकपणे मी पार पडत आहे त्यामध्ये प्रामुख्याने,
१)गरोदर आणि स्तनदा मातांची नोंद ठेवणे.
२)पूरक पोषण आहार ३ ते ६ वयोगटातील मुलांना, तसेच गरोदर व स्तनदा मातांना अंगणवाडीत शिजवलेला ताजा आहार वाटप करणे.
३)लसीकरण आणि आरोग्य तपासणी (ANM/ASHA) यांच्या मदतीने माता व बालकांचे लसीकरण आयोजित करणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे.
४) मुलांमध्ये चांगल्या सवयी, स्वच्छता आणि शिस्त यांची पायाभरणी करणे.
५)बालकांच्या वाढीची देखरेख ठेवणे तसेच ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची नियमित उंची आणि वजन मोजणे.
६) गरोदर महिला, नवजात बालकांच्या घरी गृहभेट आणि नोंदी देऊन आरोग्याबाबत मार्गदर्शन करणे.रेकॉर्ड ठेवणे,सर्व्हे रजिस्टर, गरोदर माता नोंदणी रजिस्टर, बालकांच्या वजनाचे तक्ते आणि पोषण आहार वितरणाचे रेकॉर्ड अचूक ठेवणे.
इत्यादी शासकीय कामे करत आहे,
गेली कित्येक वर्षे माझी आई मुलांना ज्ञान व संस्कार देण्याची सेवा करत आहे. सध्या माझ्या आईचे वय ६० वर्षे चालू आहे. आईचे वाढते वय असून सुद्धा काम करण्याची जिद्द थकली नसून शरीर थकत जात आहे. चालून चालून आईच्या पायांच्या गुडघ्यांची खूप झीज झाली आहे त्यामुळे गुडघे दु:खीचा आजार वाढत आहे. तरी सुद्धा ती अखंड सेवा करत आहे.
गेली कित्येक वर्षे माझी आई बाल संगोपनाचे, बालकांना संस्कार, शिक्षण, तसेच शाळेत जाण्याची ओढ, समाजात आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना कशी व कोणत्या नावाने हाक मारण्याचे शिकवणे, हात पाय स्वच्छ धुणे, स्वच्छ कपडे नीटनेटकेपणाने घालणे, असे अनेक प्रकारचे संस्कार लहान मुलांना देण्याचे कार्य माझ्या आईने केले आहेत.
वडिलांच्या निधनानंतर आमचे पालन पोषण,आमचा करता-धरता, तसेच आई-वडील भाऊ-बहीण काका-काकू मित्र-मैत्रीण अशा अनेक भूमिका आमच्यासाठी आईने निभवल्या आहेत,कोणत्याही नात्याची कमतरता आईने भासू दिली नाही.
लिहायला गेल्यावर खूप लिहिता येईल पण आईची माया मोजता येणार नाही..
ज्योतीराम दादा तुम्ही आमच्या आईचे विद्यार्थी आहात हेच आम्ही आमच्या आईचे भाग्य मानतो. तुम्ही पण तुमच्या आई-वडिलांचे कष्ट, संस्कार,परिश्रम लहानपणापासून पाहतच आला आहात, त्यापाठोपाठ आमच्या आईने तुम्हाला लावलेले शिक्षण शिकण्याची लळा, हेच संस्कार हे शिक्षण घेऊन तुम्ही सध्या चांगल्या जॉब वर नोकरीवर कार्यरत आहात, हीच माझ्या आईची पोचपावती..
एक छोट्याशा गावातील बालवाडी (अंगणवाडी) सेविकेची खरी प्रतिमा तुम्ही लोकांसमोर आणली, बालवाडीतील महिलांचे योगदान तुमच्या लेखणीतून स्पष्ट दिसून येत आहे.
तुम्ही अतिशय निर्भीडपणे लिहिलेला लेख माझ्या आईसाठी आणि आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. तुमच्या लेखणी चे आमच्या परिवार तर्फे विशेष आभार..
असेच प्रत्येक गावातील प्रत्येक तालुक्यातील विविध सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक समाजासाठी योगदान देणाऱ्या लोकांचे लेख लिहून इतर लोकांना, नवयुकांना, नव पिढीला मार्गदर्शन ठरेल हीच आशा बाळगतो..
धन्यवाद…🙏