नागू विरकर लिखित ‘हेडाम’ ही कादंबरी हातात घेतल्यावर शेवटचे पान वाचून होईपर्यंत खाली ठेवावीशी वाटत नाही. ‘हेडाम’ या शब्दाच्या व्यापक अर्थाप्रमाणेच ही कादंबरी माणदेशी भूमीतील मेंढपाळ समाजाच्या जगण्याचे, त्यांच्या वेदनांचे आणि अथांग संघर्षाचे वास्तववादी चित्र वाचकांसमोर उभे करते.
ही कादंबरी वाचताना मला माझ्या बालपणीच्या आठवणी स्पष्टपणे आठवल्या. लहानपणी गावात असताना मी पाहायचो की, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी गावातील श्रीमंत शेतकरी आणि जमीनदार या मेंढरांना आपापल्या शेतात बसवायचे (खातखतासाठी वाडा द्यायचे). पण त्या मेंढरांच्या मागून मैलोन् मैल उन्हा-तान्हात भटकणाऱ्या मेंढपाळांचे मूळ जगणे, त्यांच्या पाठीमागील अथांग कष्ट आणि वेदना किती भयानक असतात, याची खरी आणि सखोल जाणीव मला ‘हेडाम’ वाचताना झाली.
स्थलांतरित मेंढपाळांचे दिवस-रात्रीचे कठीण जीवन, निसर्गाच्या लहरीपणाशी आणि दुष्काळाशी द्यावा लागणारा लढा, एका रात्रीच्या निवाऱ्यासाठी दगड-पाणी आणि माती-चिखलात उभी राहणारी नवी चूल यांचे लेखकाने केलेले वर्णन अतिशय सूक्ष्म आणि अंगावर काटे आणणारे आहे. मुक्या प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणारा, रांगडी बोलीभाषा बोलणारा आणि बिकट प्रसंगातही खंबीरपणे उभा राहणारा हा समाज थेट हृदयाला भिडतो.
या कादंबरीतील सर्वात भावूक आणि प्रेरणादायी भाग म्हणजे नायकाचा बालपणीचा शैक्षणिक संघर्ष. अवघ्या चौथ्या इयत्तेत असताना स्वतःची चूल पेटवून भाकरी शेकण्यापासून ते गरिबीवर मात करत शिक्षण घेण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत घरच्यांचा विरोध असतानाही एका परक्या पोराला आपलंसं करून शिक्षण देणाऱ्या गुरुजींची भूमिका गुरु-शिष्य परंपरेची एक अत्यंत उदात्त व्याख्या समोर ठेवते.
‘हेडाम’ ही केवळ एका विशिष्ट समाजाची कथा नसून ती मानवी मूल्ये, स्वाभिमान, गावठी ज्ञान आणि संघर्षाची गाथा सांगणारा एक मौलिक दस्तऐवज आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिवर्तनाची दिशा दाखवणारी ही कादंबरी प्रत्येक वाचकाने आवर्जून वाचली पाहिजे. लेखकाच्या या संवेदनशील आणि कसदार लेखनाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जोतीराम बाबु शिंदे
८८९८९५५५९३
६ ऑक्टोबर २०२६