बालपणीच्या आठवणींचा पट उलगडला की कित्येक गोड प्रसंग डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटासारखे सरकू लागतात. माझ्या आयुष्यातल्या या आठवणींचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे ‘पिंपळगावचा आठवडी बाजार’. आजूबाजूच्या कित्येक खेड्यापाड्यांसाठी हा बाजार म्हणजे केवळ खरेदी-विक्रीचं ठिकाण नसून एक जिव्हाळ्याचा सोहळाच असायचा. आमच्यासारख्यांसाठी गारगोटी किंवा उत्तूर ही मोठी गावं जरा लांबच पडायची. त्यामुळे लहानपणापासून आमच्या सगळ्या गरजांचं आणि हक्काचं एकमेव ठिकाण म्हणजे पिंपळगावचा हा बाजार!
मला अजूनही आठवतंय, लहान असताना या बाजाराला चालत जाण्यात जो आनंद होता, तो आज कोणत्याही गाडीत बसून जाण्यात नाही. पायाला चटके बसू नयेत म्हणून बापाच्या मागोमाग धावत, तर कधी मित्रांच्या सोबतीने गप्पा मारत मारलेला तो टप्पा आजही मनात ताजा आहे. माझी आयुष्यातली पहिली चप्पल, शाळेचं पहिलं दप्तर आणि अभ्यासाची पहिली वही-पाटी-पेन्सिल… या सगळ्याच्या खरेदीचा साक्षीदार हा पिंपळगावचा बाजारच आहे. ती नवी वही हातात आल्यावर तिचा घमघमणारा वास आणि पाटीवर पेन्सिलने पहिलं अक्षर गिरवताना होणारा आनंद या बाजारानेच मला दिला.
आम्ही सातवी-आठवीत असू तेव्हाची एक भन्नाट आठवण आजही डोळ्यांसमोर ताजी आहे. जंगलात किंवा शिवारात भटकताना झाडावर मधाचं पोळं दिसलं की आमच्या बालसुलभ जिद्दीला उधाण यायचं. धूर करून, चावे सोसत कसाबसा मध काढायचा आणि तोच मध घेऊन थेट पिंपळगावच्या बाजारात विक्रीसाठी यायचं! तो शुद्ध मध विकून हातात जे थोडेफार पैसे मिळायचे, त्यातून मित्रांसोबत केलेली ती पार्टी आणि मिळालेला तो असीम आनंद आज लाखो रुपये खर्च करूनही मिळणार नाही.
बाजारात आल्यावर नाकाला होणारा मिरचीच्या भज्यांचा तो खमंग सुवास आजही माझ्या तोंडाला पाणी आणतो. मधाच्या पैशांतून खाल्लेली किंवा बाप सोबत असताना मिळालेली ती गरमागरम मिरचीची भजी म्हणजे आमच्यासाठी त्या काळातला सर्वात मोठा राजेशाही थाट असायचा! कडाडणाऱ्या तेलात तळल्या जाणाऱ्या भज्यांकडे बघत उभं राहणं आणि ते कागदावर घेऊन खाण्यात जो स्वर्गसुख मिळायचा, त्याची तुलना आजच्या कोणत्याही महागड्या हॉटेलातल्या पदार्थाशी होऊ शकत नाही.
त्या काळात गरजा मर्यादित होत्या आणि विश्वास उदंड होता. आजारपण आलं आणि ‘डॉक्टर’ म्हटलं की डोळ्यांसमोर एकच नाव यायचं—डॉ. संभाजी जगताप. त्यांच्या हाताची गुणकारी मात्रा आणि मायेचा शब्दच अर्धा आजार पळवून लावायचा. आणि सण-उत्सवाला किंवा शाळेसाठी नवीन ‘कपडे’ घ्यायचे म्हटले की दुसरं नावच आठवायचं नाही—पणतू अण्णा! अण्णांच्या दुकानात कपडे पाहताना आणि त्यांनी आपुलकीने दाखवलेल्या ताक्यांमधून कपडा निवडताना एक वेगळाच जिव्हाळा अनुभवायला मिळायचा.
काळाच्या ओघात सगळं काही बदललं. रस्ते मोठे झाले, सोयी-सुविधा वाढल्या, गारगोटी-उत्तूर आता लांब वाटत नाही आणि खरेदीसाठी नवीन पर्यायही उपलब्ध झाले. पण पिंपळगावच्या त्या आठवडी बाजाराने माझ्या बालपणाला दिलेला स्पर्श आजही तसाच जिवंत आहे. तो चालत जाण्याचा रस्ता, मधाचं पोळं काढून केलेली ती पार्टी, ती मिरचीची भजी, ती वही-पाटी, आणि जगताप डॉक्टर व पणतू अण्णांसारख्या माणसांचा तो सहवास… हे सगळं माझ्या आठवणींच्या कप्प्यात एका अमूल्य ठेव्यासारखं जपलेलं आहे!
जोतीराम बाबु शिंदे
८८९८९५५५९३