मागच्या रविवारी आयुष्यातला एक सुंदर दिवस अनुभवला. देवा झिंजाड सरांचा मेसेज आला, “जीत, तुला यायचंच आहे. नवोदित लेखक आहेत… फक्त ७२ वर्षांचे!” हे वाचून हसूही आलं आणि उत्सुकताही वाढली. वयाच्या बहात्तराव्या वर्षी ‘नवोदित’ होणारा माणूस कसा असेल, हे पाहायचंच होतं. त्यात पुस्तकाचं कव्हर इतकं जबरदस्त होतं की राहवलंच नाही आणि मी ९.३० वाजताच नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात हजर झालो.
निमित्त होतं माजी सैनिक आणि निवृत्त पोलीस अधिकारी प्रभाकर पवार सर लिखित ‘अंगारवाटा’ या आत्मचरित्राचं प्रकाशन. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, विचारवंत प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुमे, सागरी सुरक्षा मुंबईचे अपर पोलीस आयुक्त प्रसाद दशरथ पांढरे, देविदास तांबे यांच्यासह साहित्य, पोलीस, प्रशासन आणि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सभागृह भरलेलं होतं, आणि त्यात पवार सरांचे जुने सहकारीही मोठ्या संख्येने आले होते.
सोहळ्यातला सगळ्यात हळवा क्षण म्हणजे प्रकाशनापूर्वी पवार सरांच्या माऊलीचा, त्यांच्या आईचा झालेला सन्मान. ज्या आईने अंगारवाटेवर चालायचं बळ दिलं, तिच्या डोळ्यांसमोर मुलाचं आत्मचरित्र प्रकाशित होणं, यापेक्षा मोठा आनंद कोणता असावा! निवृत्तीनंतर वाचन, अभ्यास करून पुस्तक लिहिणं सोपं नसतं, विरक्तीच्या काळात सर्जनशीलता जपणं अवघड असतं, तरीही पवार सरांनी ते करून दाखवलं, म्हणून सर्वच मान्यवरांनी त्यांचं मनापासून कौतुक केलं. “माझ्या लेखणीला बळ दिलं त्या आरती पाटीलचे मी आभार मानतो,” असं सांगायलाही पवार सर विसरले नाहीत.
खरं तर त्या दिवशी प्रत्येकाच्या भाषणात आरती पाटील यांचं नाव आवर्जून येत होतं. त्यांच्यामुळेच इतकी सुंदर साहित्यकृती जन्माला आली, म्हणून मीही त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांना भेटायची खूप इच्छा होती, पण एवढ्या गर्दीत विचारणार तरी कोणाला? ती भेट मात्र राहूनच गेली.
पण त्या दिवशी सगळ्यात जास्त मन जिंकलं ते पवार सरांच्या छोट्या नातवाने. त्याने इतकं सुंदर भाषण केलं! तो म्हणाला, “माझे बाबा तीन-तीन तास माझ्यासाठी येऊन थांबतात आणि तिथेच बसून वाचन करतात.” हे ऐकलं आणि कळत-नकळत डोळ्यांत पाणी आलं. नातवासाठी तासन्तास थांबणारे आजोबा आणि त्या वेळेचंही सोनं करणारा वाचक-लेखक, एका लहानशा वाक्यात पवार सरांचं सगळं व्यक्तिमत्त्व उभं राहिलं. मी भावूक झालो होतो. मुळात मी खूप संवेदनशील माणूस आहे आणि अशा क्षणी माझ्या डोळ्यांत पटकन पाणी येतं. त्या दिवशीही तेच झालं.
याच सोहळ्यात बॉर्डरलेस पँथर समूहाच्या ‘मैत्रांगण’ या पाचव्या दिवाळी अंकाचंही प्रकाशन झालं. ओतूर, जुन्नरपासून पुणे-पिंपरी चिंचवडपर्यंतचे समूहातील सदस्य आवर्जून आले होते. डॉ. निलाक्षी काळे-सालके यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने कार्यक्रम छान बांधून ठेवला.
कार्यक्रम संपला आणि मी निघणार तेवढ्यात देवा सर म्हणाले, “जीत, थांब. आपण एकत्र जेवायचं आहे.” आणि पुढच्याच क्षणी मी लेखक प्रभाकर पवार सर आणि देवा सरांसोबत एका टेबलावर होतो! खरं सांगतो, सुरुवातीला भीत भीतच जेवायला बसलो. पण सरांच्या साधेपणाने काही मिनिटांतच ती भीती पळून गेली. गप्पा रंगल्या, आठवणी निघाल्या. ज्या माणसाने सैन्यात देशसेवा केली, पोलीस दलात कर्तव्य बजावलं, तो माणूस इतका साधा आणि मोकळा असू शकतो, हेच मोठं शिकणं होतं. माझं नशीब एवढं मोठं की हा दिवस माझ्या वाट्याला आला.
पुस्तकाबद्दल माझा अभिप्राय
घरी आलो आणि लगेच ‘अंगारवाटा’ हातात घेतलं. वाचायला सुरुवात केली आणि पानं कशी उलटत गेली ते कळलंच नाही.
मी शेतकऱ्याचा मुलगा. पुस्तक वाचताना माझ्याच लहानपणीच्या गोष्टी डोळ्यांसमोर तरळू लागल्या. गावाकडचे दिवस, परिस्थितीशी चाललेली रोजची झुंज, कमी साधनांत मोठी स्वप्नं पाहणारी माणसं… पवार सरांची कहाणी वाचताना ती फक्त त्यांची राहत नाही, ती आपलीच वाटू लागते. हेच या पुस्तकाचं खरं यश आहे.
‘अंगारवाटा’ हे प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत स्वतःची वाट निर्माण करणाऱ्या एका जिद्दी माणसाचं प्रामाणिक आत्मचित्रण आहे. सैनिक जीवनातली शिस्त, देशसेवेची भावना, पोलीस सेवेत आलेले कडू-गोड अनुभव आणि समाजाकडे पाहण्याची संवेदनशील नजर यांचा सुंदर मिलाफ या पुस्तकात जाणवतो. कुठेही आव नाही, स्वतःचा मोठेपणा मिरवणं नाही. जे घडलं ते सरळ, मनापासून सांगितलं आहे.
या पुस्तकाची भाषा हे त्याचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. अगदी लहान मुलालाही समजेल अशी साधी, ओघवती, मातीतली भाषा. जड शब्दांचा भडिमार नाही, पण प्रत्येक प्रसंग मनाला भिडतो. वाचक त्यात गुंतून राहतो.
संकटांपुढे न झुकता, कर्तव्याशी प्रामाणिक राहून आणि स्वाभिमान जपत पुढे कसं जायचं, हे हे पुस्तक शिकवतं. संघर्ष कितीही मोठा असला तरी जिद्द, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचार असतील तर माणूस आपलं ध्येय गाठू शकतो, हा विश्वास ‘अंगारवाटा’ वाचकाच्या मनात रुजवतं. तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, आणि विशेषतः गावाकडून शहरात येऊन धडपडणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचावं.
बहात्तराव्या वर्षी ‘नवोदित’ झालेल्या या लेखकाने सिद्ध केलं की लिहायला वय लागत नाही, अनुभव लागतो आणि तो मांडण्याची प्रामाणिक इच्छा लागते. अंगारातून वाट काढणाऱ्या माणसाच्या जिद्दीला शब्दरूप देणारं हे आत्मचरित्र अनेकांना संघर्षाशी दोन हात करण्याचं बळ देईल, यात शंका नाही.
प्रभाकर पवार सरांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आणि हा सुंदर अनुभव माझ्या वाट्याला आणल्याबद्दल देवा झिंजाड सरांचे मनापासून आभार. 🙏
जोतीराम बाबु शिंदे
८८९८९५५५९३