कौन बनेगा करोडपती’ (KBC) सारखे मोठे शो कामाच्या व्यापातून रोज बघायला मिळत नाहीत, पण काही दिवसांपूर्वी फेसबुकवर फिरत असलेला एक व्हिडिओ सहज पाहिला आणि मन अस्वस्थ झाले. हा व्हिडिओ होता KBC ज्युनियरमधील स्पर्धक ईशित भट्ट या लहानग्याचा आणि त्याचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी झालेले संवाद. व्हिडिओमधील ईशितचा अति-आत्मविश्वास आणि काहीसा उद्धटपणा पाहून जितके आश्चर्य वाटले, त्यापेक्षा जास्त वेदनादायक होते, त्या व्हिडिओखालील ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रिया. म्हणूनच, मला या विषयावर व्यक्त व्हावेसे वाटले.पाचवीत शिकणाऱ्या ईशितच्या वर्तनामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. अति-घाई करणे, अमिताभ बच्चन यांना वारंवार मध्येच टोकणे, आणि ‘मला नियम माहीत आहेत, तुम्ही शिकवू नका’ अशा अर्थाचे उद्गार काढणे… ही सर्व दृश्ये अनेक प्रेक्षकांना असभ्य आणि संस्कारहीन वाटली.
अतिघाई, उद्धटपणा की ‘वैद्यकीय संकेत’?
ईशितचे वागणे हे केवळ अति-लाडाचे किंवा अति-आत्मविश्वासाचे फलित होते, की यामागे काही दुसरे कारण होते? हा प्रश्न मला अस्वस्थ करून गेला.एवढा लहान मुलगा इतकी अतिघाई का करत आहे? का तो प्रश्नाची पूर्ण माहिती न घेता आवेगपूर्वक (Impulsively) बोलत आहे? वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, अति-घाई, शांत न बसणे, आवेगपूर्वक बोलणे आणि वागणे ही लक्षणे अनेकदा अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) या मानसिक-वर्तणुकीच्या विकाराशी जोडली जातात.ADHD असलेल्या मुलांना लक्ष केंद्रित करणे आणि आपल्या भावनांवर तसेच वर्तनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. ईशितचा ‘लॉक करा! लॉक करा!’ असा सततचा आग्रह आणि बिग बींना मध्येच थांबवण्याची त्याची प्रवृत्ती, ही केवळ उद्धटपणाची लक्षणे नसून, कदाचित त्याला स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यात येत असलेल्या अडचणीचे संकेत असू शकतात.एखाद्या लहानग्याला त्याची वैद्यकीय स्थिती माहीत नसताना किंवा त्यावर कोणताही निष्कर्ष न काढता, केवळ त्याच्या ‘वर्तनदोषांवरून’ त्याला आणि त्याच्या पालकांना जाहीरपणे ट्रोल करणे, हे अतिशय संवेदनशील आणि चुकीचे आहे.
बिग बींचा संयम: मोठेपणाचा खरा अर्थ
ईशितच्या संपूर्ण वर्तनाला अमिताभ बच्चन यांनी ज्या शांतपणे आणि समजूतदारपणे हाताळले, ते खरोखरच कौतुकास्पद होते.ईशितने वारंवार टोचून बोलले, तरीही बिग बींनी आपला संयम ढळू दिला नाही. उलट, जेव्हा ईशितने अति-आत्मविश्वासाच्या भरात चुकीचे उत्तर देऊन जिंकलेली सर्व रक्कम गमावली, तेव्हाही अमिताभ बच्चन यांनी त्याला प्रेमाने सावरले. ‘कधीकधी मुले अतिआत्मविश्वासामुळे चुका करतात,’ असे म्हणून त्यांनी ईशितला कोणतीही टोचणी न देता त्याला दिलासा दिला.अमिताभ बच्चन यांचा हा संयम, त्यांच्या महानतेची खरी ओळख आहे. त्यांनी एका चिडलेल्या दर्शकाप्रमाणे प्रतिक्रिया न देता, एका समजूतदार शिक्षकाप्रमाणे परिस्थिती हाताळली.
ट्रोलिंग आणि पालकांची जबाबदारी
ईशितच्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली की, आजच्या पिढीला ज्ञान, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास देण्यासोबतच नम्रता, आदर आणि सार्वजनिक शिष्टाचार शिकवणे किती महत्त्वाचे आहे. मुलांना ज्ञान स्पर्धेत पुढे ठेवायचे की, माणुसकीच्या स्पर्धेत, याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे.ईशितला ट्रोल करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, तो केवळ पाचवीत शिकणारा लहान मुलगा आहे. तो चुकला असेल, पण त्याला अशा प्रकारे बदनाम करणे योग्य नाही.ज्ञान आणि आत्मविश्वास महत्त्वाचा, पण नम्रता आणि संस्काराशिवाय ते व्यर्थ ठरते. अमिताभ बच्चन यांचा आदर्श समोर ठेवून, आपण एका लहानग्याला ट्रोल करण्याऐवजी, त्याला आणि त्याच्या पालकांना समजूतदारपणे मार्गदर्शन करणे जास्त महत्त्वाचे आहे.
जोतिराम बाबु शिंदे