[विशेष वृत्तांत: रुरल स्टोरी (RuralStory.in)]
काही कथा वाचायला चांगल्या वाटतात, पण काही कथा जगायला आणि अनुभवयला प्रचंड धाडस लागते. कोल्हापूरच्या मातीतील विजय शिंदे सर हे अशाच एका अचाट संघर्षाचे जिवंत उदाहरण आहेत. ज्या हातांनी परिस्थितीच्या चटक्यांमुळे हॉटेलमध्ये ताटे उचलली, त्याच हातांनी आज सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यात हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले आहे. हा प्रवास केवळ एका शिक्षकाचा नाही, तर नियतीला नमवणाऱ्या एका प्रेरणादूताचा आहे.
केळेवाडीची अनवाणी पाऊलवाट: संघर्षाचे पहिले बाळकडू
भुदरगड तालुक्यातील केळेवाडी नावाचे एक इवलेसे गाव. जेमतेम २००-३०० लोकांची वस्ती. गावात ना रस्ता, ना एसटी. अशा परिस्थितीत विजय सरांचा जन्म झाला. शिक्षणाची भूक इतकी की, प्राथमिक शाळेसाठी चिमुकल्या पायांनी रोज ७ ते ८ किलोमीटरची डोंगरदऱ्यातून अनवाणी पायपीट करावी लागत असे. पावसाळ्यात चिखलातून वाट काढताना अनेकदा पाय घसरायचे, पण जिद्द कधी घसरली नाही. याच संघर्षाने त्यांना मैदानावरचे बळ दिले, ज्यामुळे ते खो-खो राज्यस्तरापर्यंत पोहोचले आणि कर्मचारी क्रीडा स्पर्धेत सलग १८ वर्षे जिल्हास्तरावर अजिंक्य राहिले.
दिंडेवाडी विद्यालय: जिथे माणुसकीच्या झऱ्यांनी ‘विजय’ घडवला
विजय सरांच्या यशाचा खरा पाया दिंडेवाडी विद्यालय, दिंडेवाडी येथे रचला गेला. इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८४% गुण मिळवून त्यांनी विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. पण हे यश केवळ अभ्यासाचे नव्हते, तर त्यांच्या शिक्षकांच्या मायेचे होते.तत्कालीन मुख्याध्यापक एम. एस. इंदुलकर, वर्गशिक्षक येजरे सर, आणि अभ्यासात मदत करणारे शरद पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय सर घडत होते. या प्रवासात दोन्ही मुळीक सर, मोठे पाटील सर आणि मगदूम मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोठे पाठबळ लाभले. विशेषतः लहान पाटील सर यांची माणुसकी थक्क करणारी होती; सरांकडे कधी जेवण नसेल, तर ते जेवण सुद्धा पुरवण्याचे काम लहान पाटील सरांनी केले. या सर्व गुरुजनांच्या ऋणामुळेच विजय सरांची जिद्द शेवटपर्यंत टिकून राहिली.
इंजिनिअरिंगचे स्वप्न आणि नियतीचा पहिला क्रूर वार
२००४ मध्ये १२ वी सायन्सला बोर्डात ग्रामीण भागातून प्रथम येण्याचा बहुमान विजय सरांनी पटकावला. त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेमुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (GCE), कराड येथे १३२ मुलांच्या बॅचमधून एकमेव त्यांचे सिलेक्शन झाले. घरची परिस्थिती हलाखीची होती, पण नातेवाईकांकडून उसने पैसे गोळा करून फी भरली. मात्र, पहिल्या सेमिस्टरनंतर गरिबीचे चटके इतके तीव्र झाले की, राहण्याचा आणि पुस्तकांचा खर्च झेपणे अशक्य झाले. ज्या स्वप्नासाठी दिवसरात्र एक केली, त्या इंजिनिअरिंगला पैशाअभावी पहिल्याच सेमिस्टरमध्ये निरोप द्यावा लागला. तो क्षण विजय सरांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी क्षण होता.
एअरफोर्सचा ‘टॉपर’ ते ‘मेडिकल रिजेक्शन’: स्वप्नांचा दुसरा चक्काचूर
इंजिनिअरिंग सुटल्यावर सरांनी देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून मुंबई गाठली. एअर फोर्स भरतीमध्ये लेखी, फिजिकल आणि इंटरव्यू अशा तिन्ही कठीण टप्प्यांत ते ‘टॉपर’ ठरले. गणवेश आता नजरेत होता, पण नियतीने पुन्हा डाव साधला. ‘आयएनएस अश्विनी’ (INS Ashwini) मिलिटरी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या वैद्यकीय चाचणीत ‘कलर ब्लाइंडनेस’ मुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले. एका हुशार तरुणाची दोन मोठी स्वप्ने अवघ्या काही महिन्यांत धुळीला मिळाली होती.
हॉटेलमधील ‘वेटर’ची नोकरी आणि पुन्हा उभारी
दोन वेळा स्वप्नभंग झाल्यावर कोणताही सामान्य माणूस खचला असता, पण विजय सर वेगळ्या मातीचे बनले होते. गावी येऊन त्यांनी शेतात घाम गाळला. पोटाची खळगी भरण्यासाठी कोल्हापूर-सोलापूरच्या हॉटेलमध्ये ‘वेटर’ म्हणून काम केले. ग्राहकांच्या ऑर्डर घेतल्या, ताटे उचलली आणि मार्केटिंग कंपनीत उन्हात पायपीट केली. याच काळात त्यांनी डी.एड. ला प्रवेश घेतला. खर्च भागवण्यासाठी पहाटे ८ ते १० मुलांचे क्लासेस घेतले आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांतून स्वतःच्या जेवणाची सोय केली. यावेळी मोठा भाऊ सतीश यांनी पाठीवर हात ठेवून पुस्तकांसाठी मदत केली.
मैत्र जीवांचे: अमित चव्हाण नावाचा देवमाणूस
संघर्षाच्या या काळोखात अमित चव्हाण हे नाव सरांसाठी आशेचा किरण ठरले. नूल (ता. गडहिंग्लज) येथील कन्या विद्यामंदिर शाळेत सहा महिन्यांच्या इंटर्नशिपच्या काळात अमित आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विजय सरांना आपल्या घरात आश्रय दिला. स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेतली. ज्या काळात खिशात दमडी नव्हती, त्या काळात अमितच्या मैत्रीने सरांना मानसिक आधार दिला. आजही सर हा ऋणनिर्देश करायला विसरत नाहीत.
अभूतपूर्व विक्रम: क्लास न लावता जिल्ह्याचा ‘CET टॉपर’!
शिक्षक भरतीसाठी ‘सीईटी’ परीक्षा लागू झाली. सरांचे सर्व मित्र कोल्हापुरात महागडे क्लासेस लावून अभ्यास करत होते, पण सरांकडे फी भरायला पैसे नव्हते. त्यांनी घरीच राहून अहोरात्र एक महिना अभ्यास केला. जेव्हा निकाल लागला, तेव्हा संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. कोणताही क्लास न लावता विजय सर २४२ गुण मिळवून जिल्ह्यातून ‘प्रथम’ (District Topper) आले होते.
तोरणीची मूस: १५ किलोमीटरची पायपीट आणि झोपडीतील ज्ञानक्रांती
सीईटी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम येऊनही त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकांची भरती नव्हती. घराची आर्थिक जबाबदारी पाहता “नोकरी मिळवणे” हे सरांसाठी अनिवार्य होते, म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवड केली. त्या काळी नियुक्तीची पत्रे आजच्यासारखी ऑनलाईन येत नसत, तर ती टपालाने यायची. विजय सरांच्या नियुक्तीची ऑर्डर पाल गावच्या पोस्ट ऑफिसमध्ये आली होती. केळेवाडीचे पोस्ट ‘मानवळे’ असल्याने टपाल ‘पाली’वर यायचे. नोकरीची ती मौल्यवान ऑर्डर लवकरात लवकर मिळावी यासाठी सरांनी एक क्षणही वाया घालवला नाही. जोगेवाडीचे पोस्टमन संभाजी नलगे हे टपाल आणण्यासाठी पायी जात असत. एका शनिवारी सकाळी ७ वाजता विजय सर पोस्टमन नलगे यांच्यासोबत केळेवाडी ते पाल हा १५ किलोमीटरचा डोंगरदऱ्यांचा प्रवास अनवाणी पायपीट करत पार केला आणि आपली ऑर्डर हाती घेतली. ती ऑर्डर केवळ कागदाचा तुकडा नव्हती, तर त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करणारी प्रकाशाची पहिली किरण होती.
त्यांची नियुक्ती झाली ती अतिशय दुर्गम अशा ‘चौकूळ-तोरणीची मूस’ (धनगरवाडा) या शाळेत. या वाडीची परिस्थिती अशी होती की, तिथे जाण्यासाठी साधी पायवाटही अस्तित्वात नव्हती. घनदाट जंगलातून वाट काढताना समोर कधी अस्वल, तर कधी बिबट्या किंवा गवा येण्याचा धोका सतत असायचा. तिथली शाळा म्हणजे दगड-मातीची एक साधी झोपडी होती आणि ग्रामस्थही झोपड्यांतच जीवन जगत होते. शिक्षणापासून मैलोन्मैल लांब असलेल्या या वाडीवरील पहिलीच पिढी विजय सरांच्या हाती होती.
सरांनी केवळ तिथे अध्यापन केले नाही, तर त्या झोपडीवजा शाळेचा चेहरामोहरा बदलून तिला एका प्रशस्त शाळेच्या रूपात उभे केले. सलग १० वर्षे दररोज ४ किलोमीटरची जीवघेणी पायपीट करत त्यांनी या शाळेत ज्ञानदान केले. त्यांच्या मेहनतीचे फळ तेव्हा मिळाले, जेव्हा तोरणीची मूस येथील पहिली बॅच १० वीच्या परीक्षेत १००% निकालासह उत्तीर्ण झाली. ज्या वाडीवर कधी काळी साक्षरतेची ओळख नव्हती, तिथे एका झोपडीतून निघालेली मुले बोर्डाच्या परीक्षेत झळकली, हा विजय शिंदे सरांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अभिमानास्पद ‘विजय’ होता..
सामाजिक बांधीलकी: ‘कष्टातून समाजाकडे’
२००८ पासून जोतिबा सुतार यांच्या मदतीने त्यांनी ‘कै. धनाजीराव शिंदे तरुण मंडळ’ स्थापन केले. गेल्या १८ वर्षांपासून रक्तदान, व्यसनमुक्ती आणि गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व ‘रोपटे’ देऊन गौरवण्याचे कार्य ते अविरत करत आहेत. सध्या ते आंबोली नं. १ शाळेत कार्यरत असून तिथे त्यांनी मुलांसाठी BDS, GTS आणि STS सारखी स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू केली आहेत.
यशाचे खरे आधारस्तंभ: शिंदे कुटुंबाचा अढळ त्याग
विजय सरांच्या या प्रवासात त्यांच्या कुटुंबाचा त्याग हिमालया एवढा मोठा आहे:
आई (कै. शेवंताबाई): ज्यांनी पोटाला चिमटा काढून त्यांना घडवले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सरांनी केळेवाडी शाळेला स्टीलचे व्यासपीठ भेट दिले.
वडील (यशवंत रामा शिंदे) आणि आत्या (मालुबाई): ज्यांच्या कष्टाने घराचा डोलारा टिकून राहिला.
भाऊ (सतीश): ज्याने स्वतःच्या गरजा मारून भावाच्या शिक्षणासाठी रसद पुरवली.
पत्नी (माधुरी): ज्यांनी संसाराची जबाबदारी सांभाळत सरांच्या पुढील शिक्षणाला आणि सामाजिक कार्याला बळ दिले.
१५ इंजिनिअर्सची निर्मिती आणि न संपणारी जिद्द
स्वतःचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न सुटले असले तरी, सरांनी जिद्दीने आपल्या मार्गदर्शनातून आपल्या भावकीत तब्बल १५ इंजिनिअर घडवले. नोकरी करत असतानाच त्यांनी PSI परीक्षेची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली, पण केवळ २ गुणांनी त्यांचे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न हुकले. कुटुंबाची जबाबदारी मोठी असल्याने त्यांना तिथे थांबावे लागले, पण त्यांनी शिक्षणाचे व्रत सोडले नाही. M.Sc. (Mathematics) पर्यंत मजल मारली असून सध्या त्यांचे M.Ed. सुरू आहे.
निष्कर्ष: न थांबणारा ‘विजय’रथ
केळेवाडीच्या डोंगरदऱ्यातून अनवाणी चालणारा तो ‘वेटर’ मुलगा आज शेकडो तरुणांचा प्रेरणास्त्रोत झाला आहे. नोकरी करत असताना त्यांनी PSI परीक्षेची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली, पण केवळ २ गुणांनी अधिकारी होण्याचे स्वप्न हुकले. तरीही हार न मानता त्यांनी M.Sc. (Mathematics) पूर्ण केले आणि सध्या M.Ed. करत आहेत. “अधिकारी होण्याचे प्रयत्न आजही सुरू आहेत,” हा त्यांचा विश्वास आजही प्रत्येक ग्रामीण तरुणाला सांगतो की— “तुमची गरिबी तुमच्या स्वप्नांना वेढू शकत नाही, जर तुमच्या रक्तात जिद्द असेल!
“रुरल स्टोरी (RuralStory.in) कडून या अष्टपैलू संघर्षाला आणि ध्येयवेड्या शिक्षकाला मानाचा मुजरा!
विजय सरांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा लेख जास्तीत जास्त शेअर करा!
लेखन: जोतीराम बाबु शिंदे
34 comments
तुम्ही लिहिलेली पोस्ट खूप सुंदर आणि सर्वांना प्रेरणा देणारी आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष तसेच नोकरी मिळवताना आलेले अपयश पचवून परत नव्या उमेदीने त्यांनी नोकरीसाठी केलेला प्रयत्न खूप प्रेरणादायक आहे.
भाऊ तुम्ही लिहिलेली लेखणी खूप सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारी आहे. पुढील लेखन कार्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Thank you
लेखन प्रभावी, भावनिक आणि प्रवाही आहे. प्रसंगांचे तपशील जिवंतपणे उभे राहतात आणि वाचकाला कथेशी जोडून ठेवतात. भाषाशैली ओघवती असून प्रेरणादायी संदेश स्पष्टपणे पोहोचतो. थोडक्यात, हे लेखन माहितीपूर्ण तसेच मनाला भिडणारे आहे.
तुला एवढ सुचते कसं..निःशब्द आहे मी.. तुझ्या लेखणीत एवढी गंभीरता आणि तितकीच धार आहे. असाच हा प्रवास सुरू ठेव.. एक दिवस तू लिहिलेलं पुस्तक वाचायला नक्की मिळेल एवढी खात्री देतो.. लेखक म्हणून खूप नाव कमवशील..
Thank you
Jabardast katane ka hai shubhechha Vijay Shinde Saravana🙏🙏
लेखनात कथनाची ताकद ठळकपणे जाणवते. वास्तव अनुभव, संघर्ष आणि यश यांचा सुंदर समतोल साधलेला आहे. शब्दांची निवड नेमकी असून प्रत्येक परिच्छेद उत्सुकता निर्माण करतो. एकूण लेखन प्रेरणा देणारे आणि वाचकाच्या मनावर ठसा उमटवणारे आहे.
Thank you
नकीच, विजय सर भावी आयुष्यात तुम्ही खूप खूप यशस्वी व्हाल. Best of luck 👌👍
Kharch khup bar vatl vachun mansachi jeed kay aaste te vaclyanantr kalte
First thanks for heart – touching writing…
वाचन करताना माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना दहा मिनिटाच्या कालावधीमध्ये डोळ्यां समोरून सरसर निघून गेल्या… पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांचा उलगडा माझ्या हृदयामध्ये झाल्या… सर्व आठवणी हृदयाला स्पर्शून गेल्या. माणसाचा संघर्ष दुसऱ्याच्या तोंडून ऐकला तर त्याच्यासारखी प्रेरणादायी गोष्ट कोणतीच नाही.
धन्यवाद ज्योतीराम पुन्हा एकदा माझ्या सर्व आयुष्य डोळ्यासमोर उभा केल्याबद्दल..👏👏
सर्वांना प्रेरणा देशील, आयुष्यात तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे.
नक्कीच. तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे. तुम्ही भावी आयुष्यात खूप यशस्वी व्हाल यात शंका नाही.
Thank you. मी प्रयत्न करत राहीन.
लेखणीत गंभीरता आणि तितकीच धार आहे. प्रसंगाचे तपशील जिवंतपणे उभे करण्यासाठी वापरलेली भाषा साधी पण तितकीच प्रभावी ठरते. लेखन भावनिक तसेच स्फूर्तीदायक आहे .
लेखणीत गंभीरता आणि तितकीच धार आहे. प्रसंगाचे तपशील जिवंतपणे उभे करण्यासाठी वापरलेली भाषा साधी पण तितकीच प्रभावी ठरते. लेखन भावनिक तसेच स्फूर्तीदायक आहे .
सरांच्या संघर्षपूर्ण जीवनाचे अप्रतिम सादरीकरण आपण केलेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. जीवनाच्या संघर्षातून यशाकडे जाण्याचा मार्ग किती खडतर असतो हे सरानी आपल्या कृतृत्वातून सिद्ध केले. अष्टपैलू जीवनाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आपल्या लेखनातून उमटली.
Thank you Sachin dada
विजय शिंदे सरांच्या कष्ट आणि संघर्षाला सलाम!
डी एड् ला आम्ही सोबत होतो. खरोखर खूप हुशार,नम्र व्यक्ती आहेत आणि उत्तम खेळाडू आहेत. भविष्यात ते मोठे अधिकारी नक्कीच बनतील, त्यासाठी शुभेच्छा!
नक्कीच
कौतुकास्पद प्रवास,प्रेरणादायी लेखन
विजय हा माझा विद्यार्थी त्याला जवळून मी पाहिलेला आहे दिंडेवाडीत कधीतरी त्याच्या रूमवर जाऊन त्याच्यावर लक्ष ठेवून चांगला घडावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याचं फळ मी आज माझ्या डोळ्यांनी पाहत आहे विजय सारखा सुस्वाभावी मितभाषी हुशार,मनमिळावू खिलाडी वृत्तीचा विद्यार्थी माझ्या हातून घडला हे मी माझं भाग्य समजतो दहावीपर्यंत अर्धपोटी राहणारा विजय नेहमी माझ्या घराकडे यायचं आज विजय सुस्थितीत असताना मनाला आनंद वाटतो. विजय सारखा गुणी माणूस आजही संपर्कात आहे त्याच्या यशाची कमान सतत चढती राहो हीच विजेयला शुभेच्छा आणि जोतिबा तूझी लेखणी समाजातील विविध घटकांचा पैलू दाखवत राहो हीच प्रार्थना तुलाही मनःपूर्वक शुभेच्छा
धन्यवाद पाटील सर. तुमचे आशीर्वाद राहू दे.
विजय सरांची परिस्थिती… परिस्थितीला दोन हात करत केलेला संघर्ष हा आजच्या पिढीला नवल वाटेल;पण हे सत्य आहे. सरांनी आपल्या गावातील मुलांसाठी, समाजासाठी केलेले काम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे… एखादा ऑस्कर पुरस्कार चित्रपटाला लाजवेल अशी सरांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी आहे… जीत…. सरांचा जीवन चित्रपट आम्हा सर्वांच्या समोर आणलास त्या बद्दल धन्यवाद… तुझ्या लेखणीला सलाम…
धन्यवाद पाथरवट सर आशीर्वाद राहू दे.
सतीश हा माझा वर्गमित्र आणि विजय ला मी त्याच्या लहान पनापासुन पाहतोय…दोघेही नेहमी हसत राहणारे आणि आलेल्या परिस्थिती ला न घाबरता सामोरे जाणारे….विजय ला त्याच्या चिकाटीसाठी सलाम.. तुझ्या पुढील प्रत्येक यशासाठी आतापासूनच तुझे अभिनंदन…
खरच एकदम प्रेरणादायी प्रवास सलाम आहे विजय सरांना
खरच एकदम प्रेरणादायी प्रवास सलाम आहे विजय सरांना💐💐💐💐💐👍👌
जितके हुशार तितकेच नम्र आदरणीय विजय शिंदे सर तुमची संघर्षमय जीवन कहाणी वाचून तुमच्याबद्दल चा आदर अजून वाढला आहे तुमची जिद्द चिकाटी व सामाजिक कार्यामुळे भावी पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहात ! तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!
लेख खूप भावला… मनाला कुठे तरी स्पर्श करून गेला.. आपल्या भागात असे अनेक हिरे फक्त परिस्थिती मुळे तळपायचे राहून गेले याचे दाखले आज अनेक मराठी शाळेच्या भिंतीवर लिहिलेले दिसून येतात… मोठी स्वप्ने उराशी बाळगून मोठं होताना परिस्थिती चे ओझे उभं राहू देत नाही… पण याच परिस्थिती ला पायाखाली तुडवून न्हवे तर तिला वाकवून पुढे जायची जिद्द काही काजव्या कडे असते.. जे आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने कधी कधी भयाण अंधाराच्या उरात धडकी भरवतात.. विजय सर त्यातीलच एक 👍🏼👍🏼. एक उत्तम शिक्षक, गणितात कमालीचा हातखंडा आणि जिल्हास्तरीय एक उत्तम आणि सातत्याने नंबर मिळवणारा धावपटू एवढीच शिंदे सरांची आम्हाला ओळख होती पण आज खरा संघर्ष कळून आला.. 👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼
Outsatnding ….
It is spontaneous over flow of spiritual mind …. Recolleted in tranquility ….
विजय माझा 8 वी पासूनचा जिवलग वर्गमित्र… त्याचा संघर्ष पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला.. चौकूळ या गावात इलेक्शन चा सर्वे मी विजय सोबत केला आहे.. विजय ने सर्वाना मी अधिकारी आहे असे सांगितले होते.. अगदी जगाशी संपर्क नसलेली माणसे अक्षरशा पाया पडत होती.. पाणी, वीज शासकीय योजना ची माहिती विचारत होती..त्यांचं एकच वाक्य.. विजय सर आमचा आधार आहेत.. जणू काय देवमाणूस…विजय वर इतकं प्रेम की नं सांगण्यासारखं… त्याची नोकरी पाहून मी त्याला म्हंटले होते.. तु इथं नोकरी करतोस.. पण मी आधी पाहिलेली शाळा साधी होती ती सरांनी चांगली खोली बांधून घेतली होती.. चारी बाजूनं जंगल असलेल्या ठिकाणी माझ्या या मित्राने हार नं मानता कामं केले.. त्याच्या संघर्षला आणि जोतिराम तुझ्या लेखणीला सलाम 🙏🏻
Thank you sir.
छान लिहितोस की…🤟🤟…खरच गरज आहे आजच्या पिढीचा पोरांना हे कळणे…काय भेटत नसताना एवढी जिद्द होती शिकण्याची सरांची….परिस्थिती किती वाईट असली तरी हार नाही मानली पाहिजे याचे एक उत्तम उदाहरणं सांगितले आहेस तू सरांचा वरून..आणि आता सर्व काही भेटतं पण पोरांची इच्छा नाही शिकण्याची अशी परिस्थिती आहे सध्या गावा गावात…मोबाईल आणि इंटरनेट चा युगात पोर जुने खेळ पण विसरून गेलेत आज … वाटत की शाळेचे दिवसच खूप छान होते….👍👍🤟