कोल्हापूरच्या लाल मातीत अनेक वादळं आली आणि गेली, पण ममदापूरच्या अशोक विठ्ठल पोवार यांचा ‘राजा’ म्हणजे एक असा इतिहास आहे, जो पुन्हा घडणे अशक्य आहे. राजा आज अनंतात विलीन झाला असला, तरी त्याने मागे सोडलेल्या आठवणींचे घाव आजही पोवार परिवाराच्या आणि हजारो चाहत्यांच्या काळजावर ओले आहेत.
बापाचं काळीज आणि लेकराची जिद्द
अशोक विठ्ठल पोवार यांनी राजाला कधीच ‘बैल’ म्हणून पाहिलं नाही. त्यांच्यासाठी तो त्यांचा थोरला मुलगा होता. २० वर्षं अशोकरावांनी स्वतःच्या जेवणाआधी राजाच्या चाऱ्याचा विचार केला. राजाच्या श्वासावर अशोकरावांचा श्वास चालत होता. रात्री अपरात्री राजाला एकदा मायेने कुरवाळल्याशिवाय अशोकरावांना झोप येत नसे. आज तो खुंटा रिकामा झालाय, पण अशोकरावांच्या हातांना अजूनही राजाच्या अंगावरचा तो मऊ स्पर्श जाणवतोय. एका बापाने आपलं लेकरू गमावल्याचं दुःख काय असतं, हे आज ममदापूरचं प्रत्येक घर अनुभवत आहे.
पोवार कुटुंबाची साथ: एका घराण्याचं ‘दैवत’
राजाला ‘राजा’ बनवण्यात अशोक विठ्ठल पोवार यांच्या संपूर्ण कुटुंबाचा वाटा एखाद्या देवघरातील समईसारखा होता. वडील विठ्ठल रामचंद्र पोवार आणि आई आकाताई विठ्ठल पोवार यांनी राजाला घरचा वारस मानून आशीर्वाद दिला. पत्नी रुपाली अशोक पोवार यांनी एखाद्या पोटच्या मुलासारखी राजाची माया केली, तर भाऊ रवींद्र विठ्ठल पोवार (सर) आणि मुलगा अरुण पोवार यांनी राजाला आपला मोठा भाऊ आणि आधारस्तंभ मानलं. या संपूर्ण कुटुंबाच्या खंबीर साथीमुळेच राजा २० वर्षं एखाद्या अजेय ढालसारखा उभा राहिला.
केरबा मांगले मामा: राजाच्या वेगाला दिशा देणारा ‘सारथी‘
राजाचा उल्लेख होताच ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं, ते म्हणजे शिशेवाडीचे केरबा मांगले मामा! राजा जर तलवार असेल, तर ती चालवणारा हात म्हणजे केरबा मामा. मामांनी हातांत दोरी धरली आणि एक ललकारी दिली की राजाच्या अंगात वीज संचारायची. चिखली गुट्ट्याची ती जीवघेणी चढण मामांच्या अनुभवामुळे आणि राजाच्या जिद्दीमुळे सोपी व्हायची. मामांना माहिती होतं की राजाला कुठे सांवरायचं आणि कुठे मोकळं सोडायचं. या गुरु-शिष्याच्या जोडीने महाराष्ट्रातील शर्यतीची गणितं बदलून टाकली.
डोळ्यांचं पारणं फेडणारा तो थरार: चिखल डोक्याच्या वर!
वेंगरूळचं ते ऐतिहासिक मैदान असो किंवा पोळगावच्या गावाची माती… राजा जेव्हा पळायचा तेव्हा काळ-वेळ थबकल्यासारखं वाटायचं. प्रत्यक्ष पाहणाऱ्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत—त्या चिखलाच्या मैदानात राजा जेव्हा झेप घ्यायचा, तेव्हा त्याच्या खुरांनी उडालेला चिखल थेट डोक्याच्या वर जायचा! चिखलात पाय रुतण्याऐवी राजा जणू पाण्यावर तरंगत धावायचा. बघणाऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटायचं, पण डोळ्याची पापणी लवते न लवते तोच राजा ३००-४०० शर्यतींचा गुलाल घेऊन रेषेवर असायचा.
पराभवाच्या छाताडावर विजयाचा गुलाल!
राजाची ती ‘वाघाची’ जिद्द काळजाचा ठोका चुकवणारी होती. जर एखाद्या मैदानात चुकून कधी राजा हरला, तर हा वाघ खचायचा नाही; तो प्रतिशोध घ्यायचा. ज्या मैदानात राजाचा नंबर हुकला, परत त्याच मैदानात वाघाने ‘एक नंबर’ करून आपले अस्तित्व सिद्ध केलंय. बी. डी. पाटील फाउंडेशनच्या २१ हजार रुपयांच्या मैदानात राजाने दाखवलेला तो ‘एक सेकंदाचा’ लीड आजही बैलगाडा विश्वासाठी एक कोडं आहे. तो वेग नव्हता, ती तर ईश्वरी शक्ती होती!
सोबतीला साथीदार आणि विजयाची ललकारी
राजाची महती इतकी अफाट होती की त्याच्या गळ्यात पळण्याचं स्वप्न प्रत्येक मालक पाहायचा. राजाने King फौंजी, तोहीद फकीर यांचा आजरा सोन्या आणि कांदडीच्या बैलासोबत जेव्हा जोड्या जमवल्या, तेव्हा समोरच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडचं पाणी पळायचं. केरबा मामांच्या मार्गदर्शनाखाली हे साथीदार बैलही राजाच्या वेगाशी स्पर्धा करत विजयाचा गुलाल खेचून आणायचे.
निरोप एका सुवर्णयुगाचा!
भुदरगड, राधानगरी, चंदगड, आजरा, पन्हाळा आणि कोल्हापूरचा प्रत्येक गुट्टा राजाच्या पाऊलखुणांनी पावन झाला आहे. २० वर्षं सातत्याने पळणं, ३००-४०० शर्यती जिंकणं आणि ३०० पेक्षा जास्त फायनलमध्ये गुलालात न्हाऊन निघणं, हा केवळ विक्रम नाही, तर ती एका महायोद्ध्याची आणि पोवार घराण्याची २० वर्षांची अखंड साधना आहे.
“पोळगावच्या चिखलात ज्याने विजयाचा नंदी पाहिला,ज्याच्या वेगापायी काळही क्षणभर विसावला…राजा, तू निजलास शांत, पण इतिहास गाजवत राहशील,पुढच्या जन्मीही तू याच अंगणात देव होऊन येशील!”
“विठ्ठल-आकाताईंचा आशीर्वाद आणि रुपालीची माया,अशोकरावांच्या काळजात वसली राजाची ही काया…केरबा मामांच्या ललकारीने ज्याने आसमंत गाजवला,ममदापूरचा तो ‘महाकाल’ राजा आजही इतिहासात जिवंत राहिला!”
अशोक विठ्ठल पोवार, रुपाली अशोक पवार, विठ्ठल नाना, आकाताई पवार, रवींद्र सर, अरुण पोवार आणि सारथी केरबा मामा यांच्या निष्ठेला RuralStory.in चा साश्रू नयनांनी मानाचा मुजरा!अजरामर राजा… कायमचा राजा!
लेखक: जोतीराम बाबु शिंदे