तसं पाहायला गेलं तर मी असा एखादा लेख दर शनिवारी किंवा रविवारी निवांत बसून लिहित असतो. पण आज हा लेख शुक्रवारीच लिहायचे एक खास कारण आहे.
उद्या-परवा आमचे लेझीम पथक मुंबईला जाणार आहे आणि मीसुद्धा त्यांच्यासोबत जाणार आहे. शनिवार-रविवार या धावपळीत निघून जाईल, पण येजरे सरांबद्दल मनात दाटून आलेली ही कृतज्ञता आणि या आठवणी मला कोणत्याही परिस्थितीत मिस करायच्या नव्हत्या. म्हणूनच थेट सोमावारपासूनच मी हा लेख लिहायला घेतला आणि आज शुक्रवारी तो तुमच्यासमोर ठेवत आहे…
आज या सगळ्या गोष्टीला तब्बल १७ वर्ष पूर्ण झाली हे आठवूनच अंगावर काटा येतो. काळ किती वेगाने पुढे निघून गेला, पण काही आठवणी आणि काही माणसं वेळेच्या पलीकडे जाऊन मनात कायमची घर करून राहतात. १७ वर्षं झाली, तरी दिंडेवाडी विद्यालयातले ते दिवस काल घडल्यासारखे अगदी स्पष्ट आठवतात.
त्या वेळी दिंडेवाडी विद्यालयातल्या मोठ्या मुलांची एकच चर्चा असायची—”थांबा जरा, ८ वीत जाऊ द्या! बारवे गावचे येजरे सर इंग्रजी आणि भूगोल शिकवायला आले की कळेल तुम्हाला!” ती मोठी मुलं इतकी भीती घालायची की, ८ वीच्या वर्गात पाय ठेवायच्या आधीच मनातून येजरे सरांची धडकी भरली होती.
पण आज १७ वर्षांनंतर मागे वळून बघताना समजतं, तो राग, तो धाक मुद्दाम नव्हता हो. दिंडेवाडी विद्यालयात शिकणाऱ्या आमच्यासारख्या खेड्यापाड्यातल्या मुलांना इंग्रजी नीट शिकता यावं, लिहिता यावं आणि दोन शब्द आत्मविश्वासाने बोलता यावेत, यासाठीच सरांची ती सगळी धडपड चालली होती.
८ वी ते १० वीचे ते तीन वर्षं सरांनी आमचा रोज जो अभ्यास करून घेतला, तो मी आजही विसरू शकलो नाही. सर रोज काही ना काही स्टडी द्यायचे आणि विशेष म्हणजे—दुसऱ्या दिवशी वर्गात आल्यावर न चुकता तो विचारायचेसुद्धा! कुणाचीच सुटका नसायची. अभ्यासाच्या बाबतीत सरांची शिस्त एकदम कडक होती.
आजही आश्चर्य वाटतं, सर इंग्रजीचे शिक्षक होते, पण त्यांना माझं मराठी हस्ताक्षर खूप आवडायचं. इंग्रजीचा तास चालू असतानाही ते माझ्या बाकाजवळ येऊन माझं मराठीतलं लिखाण कौतुकाने पाहायचे. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते समाधान आणि ती छोटीशी शाबासकी माझ्यासाठी खूप मोठी असायची.
सरांनी शिकवलेलं ते इंग्रजीचं व्याकरण (Grammar), Question Tags, Story Writing आणि Letter Writing चे प्रकार… हे सगळं आज १७ वर्षे झाली तरी मला जसेच्या तसे आठवतंय. त्यांनी ते फक्त फळ्यावर लिहून दिलं नाही, तर आमच्या डोक्यात कायमचं बसवलं.
त्याच कडक शिस्तीचं आणि परिश्रमांचं फळ मला १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळालं होतं. इंग्रजी विषयात मला १०० पैकी तब्बल ८६ गुण मिळाले होते! जेव्हा तो निकाल हातात आला, तेव्हा मला स्वतःपेक्षा येजरे सरांची जास्त आठवण आली होती. कारण मला पक्कं ठाऊक होतं, हे जे काही गुण मिळाले होते, ते फक्त आणि फक्त सरांनी आमच्याकडून करून घेतलेल्या सरावाचे आणि त्यांच्या मेहनतीचे होते. माझ्या या यशाचं संपूर्ण श्रेय मी आजही अभिमानाने फक्त येजरे सरांनाच देतो.
आज आमचे बारवे गावचे येजरे सर मुख्याध्यापक (Headmaster) आहेत. ही बातमी जेव्हा कळाली, तेव्हा खूप आनंद झाला. ज्या माणसाने निष्ठेने आणि प्रामाणिकपणे मुलांचे आयुष्य घडवले, त्यांना हा सन्मान मिळणे अगदी योग्यच आहे.
आज १७ वर्षांनंतरही मनात एकच भावना येते—दिंडेवाडी विद्यालयात सरांनी दिलेली ती शिस्त आणि करून घेतलेला अभ्यास नसता, तर आज मी जिथे आहे तिथे कधीच पोहोचू शकलो नसतो.
मुंबईच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी सरांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा मनात एक वेगळंच समाधान देऊन गेला.
आदरणीय येजरे सर, या १७ वर्षांत खूप काही बदललं, पण तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम आजही तेवढाच आहे. तुमच्या चरणी मनापासून नमस्कार!
तुमचाच विद्यार्थी,
जोतीराम बाबु शिंदे