प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही शिक्षक येतात, जे केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर जगण्याचा मार्ग दाखवतात. माझ्या आयुष्यात ही भूमिका बजावणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे लाडके बाळासाहेब शिऊडकर सर! आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना मला सरांबद्दल लिहिताना विशेष अभिमान वाटतो.
पाचवी ते सातवीपर्यंत त्यांनी आम्हाला मराठी विषय अतिशय रंजकतेने शिकवला. वर्गात कविता शिकवताना सर त्याला स्वतःच्या शैलीत अप्रतिम चाल लावायचे. त्यांच्या सुरेल आणि लयबद्ध गायनामुळे अवघी कविता आमच्या मनात कायमची घर करायची. मराठी व्याकरणासारखा रुक्ष मानला जाणारा विषयही सर एवढ्या सोप्या पद्धतीने मांडायचे की, त्याची कधी भीतीच वाटली नाही. पुढे आठवी ते दहावीच्या वर्गात जेव्हा ते आम्हाला अर्थशास्त्र शिकवू लागले, तेव्हा त्यांच्या अध्यापनाचा एक वेगळाच पैलू पाहायला मिळाला. अर्थशास्त्रासारखे किचकट सिद्धांत शिकवताना ते आजूबाजूची व्यावहारिक उदाहरणे आणि संदर्भ द्यायचे.
दहावीत असतानाची एक आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. एखादी कठीण संकल्पना स्पष्ट करायची असेल, तर सर वर्गात वेफर्सचे पुडे किंवा पेन यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तू घेऊन यायचे. त्या वस्तूंच्या साहाय्याने अर्थशास्त्रातील मागणी, पुरवठा किंवा मूल्य यांसारख्या संकल्पना ते इतक्या सहज समजावून सांगायचे की तो विषय थेट डोक्यात उतरायचा. अध्यापनाची हीच अनोखी आणि सर्जनशील शैली त्यांना वेगळे ठरवायची. खरोखरच, ते शाळेचे दिवस किती सुंदर होते!
शिऊडकर सर आणि मी एकाच गावचे – केळेवाडीचे. पण वर्गात त्यांनी कधीही गावचा म्हणून मला किंवा इतर कोणत्याही मुलाला झुकते माप दिले नाही. त्यांच्यासाठी सर्व विद्यार्थी समान होते. ‘सर्वांना समान न्याय’ हे तत्त्व त्यांनी नेहमी पाळले. शिस्त आणि न्यायाच्या बाबतीत त्यांनी कधीही तडजोड केली नाही.
शिक्षकासोबतच त्यांच्यामध्ये एक उत्तम लेखक आणि कवी दडलेला आहे. सरांचा एक कथासंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता.
त्यांच्या कथासंग्रहातील कथा इतक्या वेधक होत्या की वाचताना मन गुंगून जायचे. दुर्दैवाने, आज मला त्या कथासंग्रहाचे नाव आठवत नाहीये, पण त्यातील शब्दांची ताकद आजही माझ्या स्मरणात आहे.
ज्ञानदानासोबतच सरांचे काळ्या मातीवरही तितकेच प्रेम आहे. आज निवृत्तीनंतरही सर आनंदाने शेतीत रमतात. ज्या प्रेमाने त्यांनी वर्गात विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले, त्याच निष्ठेने आणि कष्टाने ते आज शेतात राबत आहेत. निसर्गाच्या आणि मातीच्या सानिध्यात रमणारा हा शिक्षक खऱ्या अर्थाने जमिनीशी जोडलेला आहे.
शिऊडकर सरांनी शिक्षक म्हणून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध केले. आता निवृत्तीच्या या शांत आणि समृद्ध काळात, शेतात रमण्यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या हातातील लेखणी उचलावी, ही माझी आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांची आग्रहाची विनंती आहे. सरांनी नव्या कथा लिहाव्यात, सुरेख गोष्टी आणि भावस्पर्शी कविता रचून नवीन कथासंग्रह व काव्यसंग्रह वाचकांच्या भेटीस आणावेत. त्यांच्या समृद्ध अनुभवातून आणि लेखणीतून पुन्हा एकदा साहित्याचा सुंदर पाझर फुटावा, हीच आमची इच्छा आहे.
आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर ज्ञानाचे आणि चांगल्या संस्कारांचे शिंपण करणाऱ्या शिऊडकर सरांचे ऋण व्यक्त करणे शब्दातीत आहे. सरांना निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
– जोतीराम बाबु शिंदे