आठवणींचं दार उघडतंय
शाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते फळा, खडू, पाटी आणि गुरुजन. पण काही माणसं अशी असतात, ज्यांचं नाव कुठल्याही फलकावर लिहिलेलं नसतं, ना कुठल्या पाठ्यपुस्तकात; तरीही त्या संपूर्ण शाळेचा श्वास तीच माणसं असतात.
दिंडेवाडी विद्यालयात मी २००३ ते २००९ ही सहा वर्षं — पाचवी ते दहावी — घालवली. आज इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहताना डोळ्यांसमोर शिक्षकांचे चेहरे येतातच; पण त्यांच्याइतकेच ठळकपणे आठवतात ते आमचे शिपाई शिरपा तात्या, नामा तात्या, सदा तात्या, जानू तात्या आणि आमचे क्लार्क संजय भोइटे साहेब. हा लेख या सगळ्यांसाठी — आमच्या शाळेच्या खऱ्या शिलेदारांसाठी.
रात्री अकरा आणि पहाटे पाच
तेव्हाचे दिवस आठवले की डोळ्यांसमोर शाळेच्या वर्गातला तो पिवळा दिवा येतो. अभ्यासाचा तास संपायचा तेव्हा घड्याळात रात्रीचे अकरा वाजलेले असायचे. सगळं गाव सामसूम झालेलं असायचं, पण आमचे तात्या मात्र जागे असायचे.
हातात बॅटरी, अंधारातली पायवाट आणि मागे आम्ही मुलं-मुली. प्रत्येकाला त्याच्या घराच्या दारापर्यंत सुखरूप सोडल्याशिवाय ते स्वतःच्या घरी जात नसत. कुणाला भीती वाटू नये, कुणाच्या आई-बापाची काळजी मिटावी — ही जबाबदारी त्यांनी कधी नोकरी म्हणून नाही, तर पोटच्या लेकरांसारख्या आपुलकीने सांभाळली.
आणि हे इथेच संपायचं नाही. काही तासांची झोप घेतली ना घेतली की पहाटे पाच वाजता पुन्हा ते आमच्या दारात हजर. थंडी असो, पाऊस की धुकं — कशाचीही तमा न बाळगता ते आम्हाला अभ्यासाला घेऊन जायचे. आज मागे वळून पाहताना कळतं, त्या पहाटेच्या अंधारात ते नकळत आमच्या भविष्याला उजेड दाखवत होते.
शिक्षकांनी आम्हाला ज्ञान दिलं, यात शंकाच नाही; पण ते ज्ञान घेण्यासाठी आम्ही सुखरूप वर्गात पोहोचू शकलो, ते या माणसांमुळे. म्हणूनच मी आज अभिमानाने सांगतो — आमच्या यशात जितका वाटा शिक्षकांचा आहे, तितकाच मोठा वाटा या तात्यांचाही आहे.
आमची माणसं
शिरपा तात्या, नामा तात्या, सदा तात्या आणि जानू तात्या — ही नावं जरी उच्चारली, तरी आजही मनात एक उबदार सुरक्षितता जागी होते. शाळेची घंटा वाजवणं, वर्ग झाडणं, पिण्याच्या पाण्याची सोय, कागदपत्रं सांभाळणं — ही कामं कागदावर लहान वाटतात, पण त्यांच्याशिवाय शाळा एक दिवसही चालू शकत नाही. आणि या सगळ्या कामांत त्यांनी कधी कंटाळा दाखवला नाही.
आणि त्या नोटिसा! तासाच्या मध्येच वर्गाच्या दारात तात्या नोटीस बुक घेऊन उभे राहिले, की सगळा वर्ग क्षणात शांत व्हायचा. सगळ्यांचे डोळे त्या वहीवर खिळलेले असायचे — सुट्टीची नोटीस आहे की जादा तासाची? सर नोटीस वाचू लागले आणि ती उद्याच्या सुट्टीची निघाली, की वर्गात एकच जल्लोष व्हायचा! आणि जादा तासाची असली, की सगळ्यांचे चेहरे उतरायचे. पण दोन्ही प्रसंगी दारात उभ्या असणाऱ्या तात्यांच्या चेहऱ्यावर तेच हलकं, ओळखीचं हसू असायचं. आज मागे वळून पाहताना कळतं — त्या वहीतून ते फक्त नोटिसा नाही, तर आमच्या बालपणीचे छोटे-छोटे आनंद घेऊन यायचे.
त्यांच्या जोडीला ऑफिसमध्ये संजय भोइटे साहेब. फी, दाखले, परीक्षेचे अर्ज, शिष्यवृत्तीचे कागद — प्रत्येक विद्यार्थ्याचं काम ते अगदी स्वतःचं काम असल्यासारखं करायचे.
कागदावरची एक छोटीशी चूकसुद्धा मुलाचं वर्ष वाया घालवू शकते, हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. शिक्षकेतर कर्मचारी कसा असावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही सगळी माणसं.
तसंच मी शाळा सोडत असतानाच पाथरवट सरांचं आगमन झालं होतं. एम. एस. इंदुलकर सर कामानिमित्त बाहेर असले की पाथरवट सर मोठ्या आवडीने आम्हाला इतिहास शिकवायचे, त्यांच्या त्या शिकवण्याच्या पद्धतीची आठवण आजही ताजी आहे.
आज शिरपा तात्या आणि नामा तात्या रिटायर झाले आहेत. पण निवृत्ती ही फक्त नोकरीची असते, नात्यांची नाही. शिरपा तात्या, नामा तात्या आणि सदा तात्या आजही माझ्या संपर्कात आहेत. कधी फोन करून, तर कधी भेटल्यावर आपुलकीने विचारतात — “कसा आहेस? सगळं बरं चाललंय ना?” त्या एकाच प्रश्नात सहा वर्षांचं सगळं प्रेम सामावलेलं असतं.
पुस्तक प्रकाशनाचा तो दिवस
माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा दिवस माझ्या आयुष्यातला एक सोनेरी दिवस होता. पण त्या दिवसाला खरं सोनं केलं ते माझ्या शाळेतल्या या माणसांनी.
नामा तात्या तेव्हा पुण्यात असल्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, पण त्यांनी आवर्जून फोन केला. फोनवरचा तो त्यांचा ओळखीचा आवाज आणि त्यातला अभिमान — “आपल्या शाळेचा पोरगा पुस्तक लिहितोय!” त्या काही मिनिटांच्या गप्पांनी माझं मन भरून आलं. माणूस लांब असला तरी मनं जवळ असू शकतात, हे त्या दिवशी पुन्हा जाणवलं.
शिरपा तात्यांचं तर काय सांगावं! न बोलावता ते शाळेत हजर होते. निवृत्त होऊनही त्यांची धावपळ तीच — खुर्च्या लाव, पाहुण्यांना बसव, कामात हातभार लाव. जणू काही बदललंच नव्हतं; वीस वर्षांपूर्वीचे शिरपा तात्याच पुन्हा डोळ्यांसमोर उभे होते. त्यांना तसं पळापळ करताना पाहून डोळे पाणावले.
सदा तात्या आणि जानू तात्या या दोघांनी सगळ्यांच्या चहा-नाश्त्याची सोय केली. कोणी सांगितलं नव्हतं, कोणी अपेक्षाही केली नव्हती — तरीही सगळं वेळेत आणि प्रेमाने. त्या चहाच्या कपात मला पुन्हा त्या जुन्या पहाटेंची ऊब जाणवली.
इतक्या वर्षांनंतर त्या सगळ्यांना एकत्र पाहिलं आणि मन खूप भरून आलं. माझं पुस्तक त्या दिवशी प्रकाशित झालं; पण त्याहून मोठं म्हणजे या माणसांचं अढळ प्रेम पुन्हा एकदा अनुभवता आलं.
दिलेला शब्द
त्या दिवशी निघताना मी त्यांना एक शब्द दिला होता — हा अर्धा राहिलेला लेख पुढच्या आठ दिवसांत पूर्ण करून पाठवतो. आज तो शब्द पाळतोय.
पण खरं सांगायचं तर, तुमच्या ऋणाबद्दल कितीही लिहिलं तरी ते अपूरंच राहणार; कारण तुम्ही जे दिलंत ते शब्दांत मावणं शक्यच नाही.
शिरपा तात्या, नामा तात्या, सदा तात्या, जानू तात्या आणि भोइटे साहेब — तुम्ही आम्हाला रात्री घरी सोडलंत, पहाटे अभ्यासाला आणलंत आणि आयुष्याच्या वाटेवर सुखरूप पोहोचवलंत. आज आम्ही जे काही आहोत, त्यात तुमच्या त्या जागरणांचा, त्या पायपीटीचा आणि त्या निःस्वार्थ प्रेमाचा खूप मोठा वाटा आहे.
हा लेख म्हणजे फक्त आठवणी नाहीत, तर एका विद्यार्थ्याने उशिरा का होईना, मनापासून मानलेले आभार आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!
जोतीराम बाबु शिंदे
८८९८९५५५९३