दिंडेवाडी हायस्कूलच्या लाल मातीत रुजलेली ती खो-खोची आठवण आणि तो थरार आजही माझ्या मनात अगदी जसाच्या तसा ताजा आहे. भुदरगडच्या कुशीत वसलेलं आमचं हायस्कूल, धुळीने माखलेले आमचे पाय अन् मैदानात घाम गाळून खेळलेली ती पोरं… ती फक्त एक स्पर्धा नव्हती, तर खेळाची शिस्त, जिद्द आणि मातीतल्या खेळावर असणाऱ्या प्रेमाची सुरस कथा होती!
ती गोष्ट आहे मी दिंडेवाडी हायस्कूलला असतानाची. शाळेत लहान गटाच्या खो-खो टीमची निवड सुरू झाली होती. वर्गात एकापेक्षा एक उत्साही अन् मैदानात ताकदीची पोरं होती. आमचा वैभ्या तर आधीच सिलेक्ट झाला होता आणि सुज्या—हे दोघं आधी एकदा पुष्पनगरला खेळून आलेले. त्यामुळे त्यांना खेळाचा छान अनुभव होता. पण आमच्या वर्गातल्या बाकीच्या पोरांमध्ये बी काय कमी धमक नव्हती. मी, आमचा उत्तम, परव्या कांबळे, सुरया डाकरे, जयवंत डाकरे, सुरज्या रब्बे, सत्या भारमल अन् प्रव्या भारमल… एकाहून एक चपळ!
निवडीच्या वेळी मैदानात असा धुमाकूळ उडाला की कुणीच कुणापेक्षा कमी दिसेना. “अरं परव्या, जरा दमानं पळ, केवढा वेग घेतलायस!”, “सुरया, सावध राहून पोल धर!” असा पोरांचा उत्साही ओरडा चालू होता. अखेर आमची टीम निवडली गेली आणि सुरू झाला रोजचा कडक सराव.
कधी मोठे पाटील सर तर कधी लहान पाटील सर हातात व्हिसल घेऊन मैदानात उभे राहायचे.
“पाया ताणून पळा रे! पाठीवर हात पडला नाही पाहिजे!”, मोठे पाटील सर प्रेमाने समजवायचे.
तर लहान पाटील सर आमचे छातीची सालपाटे अन् गुढगे सोललेले बघून पाठीवर हात फिरवत म्हणायचे, “अरं ही भुदरगडची माती हाय! इथं जिद्दीने खेळाल तरच चांगला खेळ दाखवू शकाल. उठा अन् जोराने पळा!”
त्या काळी खो-खोच्या विश्वात पुष्पनगरच्या टीमचे भलतेच नाव होते. खेळात अत्यंत हुशार अन् शिस्तबद्ध असणारी ती एक तगडी टीम मानली जायची. आम्ही बी मनापासून ठरवून उतरलो होतो—यंदा उत्तम सराव करायचा अन् पुष्पनगरच्या होम ग्राउंडवर त्यांच्याशी चुरशीची आणि चांगली फाईट द्यायची!
बघता बघता विभागीय स्पर्धेचा दिवस उजाडला. स्पर्धा होती पुष्पनगरच्याच प्रसन्न वातावरणात अन् मोठ्या मैदानावर. चोहोबाजूंनी क्रीडाप्रेमींची तुफान गर्दी होती. मनात एकच ध्येय होते—‘यंदा आपल्या खेळाची छाप पाडायची!’
पहिली मॅच: पेठ शिवापूर विरुद्ध
पहिलीच मॅच लागली पेठ शिवापूर बरोबर. त्यांच्या टीममध्ये ‘आर्ज्या’ नावाचा पोरगा भलताच चपळ होता. तोंडात रुमाल घालून, वाऱ्याच्या वेगाने पळायची त्याची मस्त पद्धत होती. मैदान मारताना आर्ज्या हुलकावणी देऊन प्रेक्षकांची दाद मिळवायचा.
“आर्ज्याला योग्य वेळी पोल मारून टिपायला हवे, सावध राहा!”, लहान पाटील सरांनी मोलाचा सल्ला दिला.
मॅच सुरू झाली. आर्ज्या तोंडात रुमाल दाबून मैदानात वेगाने पळत होता. पण आमचा उत्तम बी भलताच सावध! उत्तमने त्याला एका कोपऱ्यात घेरलं. आर्ज्या निसटणार तितक्यात उत्तमने हवेत अशी सनसनाटी डाईव्ह मारली अन् पोल धरून थेट आर्ज्याच्या पाठीवर स्पर्श केला! “आऊट!” पंचांची व्हिसल वाजली.
“शाब्बास उत्तमा! काय टाईमिंग साध्य केलंस!” मैदानातून जयवंत डाकरेने कौतुक केले.
पहिल्या डावात आम्ही त्यांचे १० गडी टिपले. अन् आमचा वैभ्या? गड्या, काय सांगू! वैभ्या मैदानात उतरला नि सलग ५ मिनिटं एकटाच कौशल्य दाखवत पळत राहिला.
“वैभ्या, छान! असाच संयम ठेव!”, मी बाकावरून प्रोत्साहन देत होतो.
दुसऱ्या डावात आर्ज्या अन् त्याच्या टीमने सुरेख पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या पोरांनी बी कडक बचाव केला. परव्या कांबळेने अन् सुरया डाकरेने डाईव्ह मारून उरलेले गडी बाद केले. पहिली मॅच दणक्यात जिंकली! दोन्ही पाटील सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.
दुसरी मॅच: गंगापूर विरुद्ध
दुसरी मॅच आली गंगापूर सोबत. त्यांची टीम बी लय तंत्रशुद्ध खेळणारी! पण आमच्या पोरांच्या पायात वेगळाच उत्साह होता. सत्या भारमल आणि प्रव्या भारमल या भावंडांनी मैदानात असा काय ताळमेळ दाखवला!
“सत्या, डावीकडून फिर! प्रव्या, खो दे!”, मी सांगत होतो.
प्रव्याने खो दिला नि सत्याने हवेत झेप घेत गड्याला टिपले. पडताना सत्याचे गुढगे फुटले, माती लागली, पण तो हसत उठून ओरडला, “सर, काही नाही झालं, खेळू द्या!” गंगापूरच्या चांगल्या टीमला हरवत आम्ही थेट सेमी फायनल गाठली!
सेमी फायनल: म्हसवे विरुद्ध (अटीतटीचा खेळ)
सेमी फायनलला समोर आली ‘म्हसवे’ची कडक टीम.
पहिल्याच डावात त्यांनी आमची ९-१० पोरं बाद केली नि आम्ही मात्र त्यांचे फक्त ४ गडी टिपू शकलो. पहिल्या डावात तब्बल ६ गुणांचा मोठा फरक पडला! ब्रेक लागला तसे मोठे पाटील सर खेळातील चुका दाखवत थोडे गंभीर झाले.
“हे काय खेळताय रे पोरांनो? सेमी फायनलसारख्या मोठ्या मॅचमध्ये असा ढिला खेळ चालणार नाही,” सरांनी समजावले. “आपल्या शाळेचे नाव राखायचे असेल तर पूर्ण ताकदीने आणि जिद्दीने खेळा!”
सरांच्या त्या शब्दांनी आमच्या मनात खेळण्याची नवी ऊर्जा निर्माण झाली.
“काय बी होऊ दे, आता पूर्ण ताकद लावून खेळायचे!”, मी पोरांना गोळा करून विश्वासाने सांगितले.
जयवंत डाकरे म्हणाला, “भावा, आज जितका घाम गाळता येईल तितका गाळू, पण सामना जिंकायचाच!”
दुसरा डाव सुरू झाला. आम्ही जिद्दीने मैदानात उतरलो. मी मैदानात धावलो, समोरून म्हसवेचा गडी निसटत होता, मी अजिबात वेळ न गमावता टणक मातीत थेट डाईव्ह मारली! माझी छाती पार घासली गेली, छातीची सालपाटे निघाली, पण माझा हात त्याच्या पायाला लागला—”आऊट!”
पाठोपाठ सुरया डाकरेने पोल मारून दुसऱ्याला टिपले, तर परव्या कांबळेने जमिनीवर लोळून तिसऱ्याचा पाय धरला. आम्ही एकापाठोपाठ एक त्यांचे १५ गडी बाद केले!
आता म्हसवेला जिंकण्यासाठी १० गुणांची गरज होती. पण आमच्या बाजूने पहिलीच जोडी पळायला आली—मी, उत्तम, वैभ्या अन् सुज्या!
“५ मिनिटं सांभाळून खेळायचे आहे पोरांनो, एक बी गडी बाद होऊ देऊ नका!”, लहान पाटील सरांचा आवाज घुमला.
गड्या, ते ५ मिनिटं म्हणजे काय कौशल्यपूर्ण खेळ झालाय म्हणून सांगू!
म्हसवेचे खेळाडू सर्व शक्ती पणाला लावून गडी टिपण्याचा प्रयत्न करत होते. सुज्याने अशी सुरेख हुलकावणी दिली की मागचा खेळाडू चकून बाजूला गेला. वैभ्या नागमोडी वळणं घेत पळत होता. मी अन् उत्तम एकमेकांना नजरेनेच इशारे करत होतो.
“उत्तम, डावीकडे लक्ष ठेव!”, मी ओरडलो.
उत्तमने हवेत उडी मारून खो चुकवला. ५ मिनिटं संपली… पंचांची व्हिसल वाजली! एक बी गडी बाद झाला नव्हता!
अख्खं मैदान टाळ्यांनी भरून गेलं! आम्हाला पाठिंबा द्यायला आमच्या दिंडेवाडी गावातील कॉलेजची पोरं बी धावत आली होती. अटीतटीची ती सेमी फायनल जिंकून आम्ही थेट फायनलमध्ये धडक मारली होती!
फायनल: पुष्पनगर विरुद्ध (कौशल्याचा आणि चुरशीचा रणसंग्राम)
अन् आता वेळ आली होती स्वप्नातल्या महान ‘फायनल’ची!
सामना होता ‘पुष्पनगर’सारख्या मातब्बर टीमसोबत… त्यांच्याच होम ग्राउंडवर! चोहोबाजूंनी प्रेक्षकांचा प्रचंड उत्साह अन् खेळाडूंचे कौतुक करणाऱ्या घोषणा चालू होत्या. पुष्पनगरची खो-खो मधील पकड आणि अनुभव खूप मोठा होता, पण आम्ही बी अत्यंत मेहनतीने इथवर पोहोचलो होतो.
मोठे पाटील सरांनी आमच्या खांद्यावर हात ठेवला. “पोरांनो, समोर कितीही अनुभवी टीम असली तरी तुम्ही उत्तम खेळ दाखवायचा! मैदानात जाऊन आपली दिंडेवाडीची शिस्त अन् खेळ दाखवा!”
शिट्टी वाजली, फायनलचा सामना सुरू झाला!
पहिला डाव आम्ही पळालो. पुष्पनगरचे खेळाडू अत्यंत चपळ होते, पण आमचा सत्या भारमल अन् प्रव्या भारमल संयमाने लढले. त्यांनी आमचे ४ गडी मारले. मग आम्ही बसलो.
“जयवंत, खो घे!”, मी ओरडलो.
जयवंत डाकरेने पळत जाऊन पोल मारला नि पुष्पनगरच्या पहिल्या गड्याला बाद केले. पाठोपाठ सुरया डाकरेने अन् मी मिळून उरलेले ३ गडी टिपले. पहिला डाव ४-४ असा थरारक बरोबरीत सुटला!
आता आला निर्णायक दुसरा डाव!
पुष्पनगरच्या खेळाडूंनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर सुरेख चढाई करत आमचे ६ गडी मारले. आता सामना जिंकण्यासाठी आम्हाला ७ गडी मारायचे होते. वेळ कमी उरली होती अन् सामन्यात प्रचंड उत्कंठा वाढली होती!
“६ गडी गेलेत, ७ मारायचेत… पोरांनो, शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्ण प्रयत्न करा!”, लहान पाटील सर रेषेवरून ओरडत होते.
सुरू झाली आमची आक्रमक चढाई!
उत्तमने धावत जाऊन पहिला गडी मारला.
वैभ्याने पोल धरून हवेत झेप घेत दुसऱ्याचा खांदा टिपला.
सुज्याने सुरेख डाईव्ह मारून तिसरा गडी बाद केला.
मी पळालो, समोर पुष्पनगरचा मुख्य खेळाडू हुलकावणी देत होता… मी अंगातली सगळी ताकद गोळा केली अन् उडून थेट मातीत डाईव्ह मारली! माझे दोन्ही गुढगे फुटले, माती अन् रक्ताचा डाग लागला, पण माझी बोटं त्याच्या पायाला टेकली होती—”चौथा आऊट!”
मैदानावर दोन्ही बाजूंच्या प्रेक्षकांचा कल्ला सुरू होता. वेळ संपायला फक्त काही सेकंद बाकी होते. जयवंत डाकरे अन् प्रव्या भारमल यांनी अजून एक गडी मारला… झाले ५ गडी!
आम्हाला अजून २ गडी हवे होते… वेळ वेगाने धावत होती… ५… ४… ३… २… १… अन् पंचांची लांब व्हिसल वाजली!
सामना संपला. आम्ही ५ गडी मारू शकलो होतो. पुष्पनगर ६ – दिंडेवाडी ५.
आम्ही ती फायनल अवघ्या एका गुणाने हारलो होतो!
व्हिसल वाजताच मैदानावरील वातावरण शांत झाले. आम्ही सगळे खेळाडू थकून, लाल मातीने माखून मैदानावरच खाली बसलो. माझ्या दोन्ही गुढघ्यांतून चुरचुर होत होती, छातीची सालपाटे निघाली होती, अन् अवघ्या १ गुणाने सामना हातातून गेल्यामुळे डोळ्यात आपोआप पाण्याचे थेंब आले होते.
तवच, मोठे पाटील सर अन् लहान पाटील सर धावत मैदानात आले. त्यांनी आम्हाला उठवून घट्ट मिठी मारली.
“रडू नका रे माझ्या वाघानो!”, लहान पाटील सरांचा आवाज घूमला होता. “तुम्ही खूप सुंदर खेळलात! पुष्पनगरसारख्या बलाढ्य नि अनुभवी टीमला त्यांच्याच मैदानावर शेवटच्या सेकंदापर्यंत अटीतटीची टक्कर दिलीत, हे काही कमी नाही!”
आणि मग जे घडलं, ते क्रीडा भावनेचे अत्यंत सुंदर उदाहरण होते…
पुष्पनगरचे शिक्षक, तिथली पोरं अन् प्रेक्षक उठून उभे राहिले आणि त्यांनी आमच्या प्रामाणिक खेळासाठी टाळ्यांचा कडकडाट केला!
पुष्पनगरचा मुख्य कॅप्टन माझ्या जवळ आला, त्याने माझा मातीने माखलेला हात हातात घेतला अन् कौतुकाने म्हणाला, “भावा, आजपर्यंत आम्हाला अशी चुरशीची नि कडक टक्कर कुणीच दिली नव्हती. मानलं तुमच्या दिंडेवाडीच्या टीमला, काय अप्रतिम खेळलात!”
आमच्या गावची कॉलेजची पोरं धावत आली अन् त्यांनी मला, उत्तमला, वैभ्याला खांद्यावर उचलून घेतले.
विजेतेपदाची ट्रॉफी भले पुष्पनगरला मिळाली असेल, पण त्या दिवशी पुष्पनगरच्या लाल मातीत दिंडेवाडी हायस्कूलच्या पोरांनी आपल्या कौशल्याने आणि खेळाच्या जिद्दीने सर्वांची मनं जिंकली होती! ती वाहव्वा, तो दोन्ही टीममधील खेळाडू वृत्तीचा आदर, पाटील सरांचे ते अभिमानास्पद शब्द नि तांबड्या मातीचा तो सुगंध आजही माझ्या रोमारोमात तसाच जिवंत आहे!
जोतीराम बाबु शिंदे
८८९८९५५५९३