चिखल गुट्टा शर्यतीचा शहेनशहा पोळगावचा ‘बंड्या’
ती वेळ वेगळी होती, तो काळच वेगळा होता… आपण सगळे लहानाचे मोठे होत असताना मैदानात एकाच नावाची आणि एकाच जोडीची हवा होती. हॉटेलमध्ये हातात चहाचा कप असो वा ताटात गरमागरम भजी, मैदानाच्या निवेदकाने माईकवर फक्त एक नाव पुकारलं—”गुणाजी रामू धडाम…”—की हातातला चहा तसाच खाली ठेवून, म्हातारे-कोतारे, तरुण अन् लहान मुलं अक्षरशः पळत सुटून मैदानाच्या काठावर येऊन उभी राहायची! कारण सगळ्यांना ठाऊक होतं, आता चिखल गुट्टा शर्यतींच्या मैदानात तुफान वादळ येणार आहे!
जसा तीन फेऱ्यांच्या मैदानात ‘बकासुर’ने आपला दरारा निर्माण केला, तसाच चिखल गुट्टा शर्यतींच्या भूतकाळात आपल्या पायांच्या आवजाने प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा अनभिषिक्त बादशहा म्हणजेच पोळगावचा ‘बंड्या’!
या प्रवासात सर्वात मोठा सलाम जातो तो मालक शामराव नेवगे यांना! आजरा तालुक्यातील पोळगावच्या शामराव नेवगे यांनी म्हशीच्या गोठ्यात आवडीने पाळण्यासाठी संकेश्वरच्या बाजारातून गोल शिंगांचा, पांढऱ्या शुभ्र रंगाचा आणि ‘झाणल झुंड’ जातीचा हा पाडा अवघ्या १० हजार रुपयांना आणला होता. दिसायला जरी लहान आणि छोटा असला, तरी रूप असं देखणं की पहिल्याच नजरेत काळजात भरायचा! सर्वात खास म्हणजे त्याचं जबरदस्त वशिंड… लहान असूनही ते वशिंड आणि त्याची ठेवण इतकी रुबाबदार होती की बघणारा बघतच राहायचा! अंगात विजेचा वेग आणि उरामध्ये वाघाचं काळीज घेऊनच तो जन्माला आला होता.
पण हिऱ्याची पारख जशी जोहरी करतो, तशीच या धाकट्या बंड्यातला लपलेला वादळी वेग गुणाजी रामू धडाम यांनी पहिल्याच नजरेत ओळखला! लहानपणीच (आदत-लहान असतानाच) गुणाजीरावांनी बंड्याचा गुण ओळखून त्याला आपल्या बैलाच्या साथीने मैदानात उतरवलं. आणि तिथून सुरू झालेला हा प्रवास एका-दोन वर्षांचा नाही, तर सलग १५ वर्षांचा राहिला!
इथे कौतुक करावं लागेल ते मालक शामराव नेवगे यांचं! सलग १५ वर्षे बंड्याचा पैरा (जोड) एकनिष्ठतेने टिकवून ठेवणं, गुणाजीरावांवर आणि आपल्या बैलावर अथांग विश्वास ठेवणं हे सोपं काम नव्हतं. बाजारात कितीही प्रलोभने आली, अनेक अडचणी आल्या, तरी शामराव नेवगे यांनी बंड्याचा पैरा कधी मोडू दिला नाही. सलग १५ वर्षे एकनिष्ठतेने पैरा टिकवून धरणाऱ्या अशा दिलदार मालकाला शतशः सलाम!
बंड्याची सर्वात मोठी खासीयत म्हणजे त्याला धरण्यासाठी किंवा सांभाळण्यासाठी फक्त आणि फक्त त्याचे मालक शामराव नेवगे असायचे. इतरांच्या हाताला सहज न लागणारा हा बैल अतिशय शाणा, हुशार आणि मालकावर अपार निष्ठा असणारा होता. मालकाने “बंड्या थांब” म्हटले की जागीच थांबणारा आणि “सरक” म्हटले की सरकणारा हा समजूतदार बैल होता.
पण जेव्हा शर्यतीचा दिवस यायचा, तेव्हा मैदानातला थरार काही वेगळाच असायचा! चिखल गुट्टा शर्यतींच्या तळात बंड्याला पळवणं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती, ते अक्षरशः शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. आणि हे शिवधनुष्य त्याचा एकनिष्ठ गुट्टापट्टू तानाजी पाटील यांनी लीलया पेललं! एक डोळा नसला तरी तानाजी पाटील म्हणजे मैदानातला साक्षात वाघ होता.
गुट्टयाला जुंपलेला बंड्या तळीत उभा राहिला, की त्याचा श्वास गती पकडायचा. अवतीभवतीचा जनसागर शांत व्हायचा… आणि जशी शर्यतीची ‘सुरु’ व्हायची, तसा तानाजी पाटलांची हाक, गुणाजीरावांचा विश्वास आणि बंड्याची झेप एकाच वेळी सुटायची! तो सुट्टीचा क्षण म्हणजे अंगाचा थरकाप उडवणारा असायचा. गळ्यातल्या घंटीचा निनाद, चिखलाचा उडणारा फवारा आणि वाऱ्यालाही मागे टाकेल असा बंड्याचा वेग! बंड्या एकदा तळात सुटला की लाल चिखल आणि पाणी थेट लोकांच्या डोक्याच्या वर उडायचं! “एकदा सुटला, की निशाण पडेपर्यंत सुट्टी नाही!”—हाच त्यांचा रांगडा ठसका होता.
झप्पकन निशाण पडायचं आणि स्टॉपवॉच हातात धरलेला पंच ओरडायचा—”एक नंबर… वेळ इतकी सेकंद!”
त्या टायमिंगची घोषणा होताच आख्खं मैदान उठून उभं राहायचं! गुलाल हवेत उडायचा, ढोल-ताशांचा कडकडाट व्हायचा आणि लोकांच्या तोंडून एकच जल्लोष घुमायचा—”बंड्या… शामराव… गुणाजीराव…!” मालक शामराव नेवगे यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहायचे, तर तानाजी पाटील बंड्याच्या गळ्याला मिठी मारून त्याला मायेनं जवळ घ्यायचे.
मैदानात किंवा तळीमध्ये कित्येक मोठमोठे, धिप्पाड आणि महागडे बैल बंड्याच्या जोडला उभे राहिले, पण बंड्या, मालक शामराव नेवगे, गुणाजीराव धडाम आणि तानाजी पाटलांच्या या निष्ठावंत त्रिकुटासमोर कोणाचे काही चालले नाही. अवघ्या १० हजार रुपयांच्या या छोट्याशा आणि देखण्या बैलाने आपल्या प्रामाणिकपणाच्या, चिकाटीच्या आणि तुफानी वेगाच्या जोरावर आपल्या मालकाचे नाव शर्यतीच्या इतिहासात अजरामर करून ठेवले!
आज काळ बदलला… कित्येक वर्षे उलटून गेली. आज तो बंड्या हयात आहे की नाही, हे कोणालाच ठाऊक नाही… त्याच्या मालकांनी अजूनही तो नाद, ती मातीशी बांधलेली निष्ठा जपली आहे की नाही, हेही माहीत नाही. जुन्या आठवणी काढताना आजही शर्यतप्रेमींच्या डोळ्यांत पाणी येतं आणि छाती अभिमानाने भरून येते. जर त्यांच्या घरी कोणाकडे मोबाईल असेल, तर हा लेख नक्की त्यांच्यापर्यंत पोचवा! त्यांनाही कळावं की, शामराव नेवगे यांच्या निष्ठेने, गुणाजीरावांच्या पारखी नजरेने आणि तानाजी पाटलांच्या वाघासारख्या जिद्दीने एका संपूर्ण पिढीच्या काळजात बंड्याचं स्थान कायमचं कोरलं आहे.
सलग १५ वर्षे चिखल गुट्टा शर्यतींच्या चिखलात आपल्या खुरांचे ठसे उमटवून कित्येक मैदाने मारणारा हा ‘बंड्या’ खऱ्या अर्थाने चिखल गुट्ट्याचा देव, पोळगावची शान आणि शर्यतीचा अनभिषिक्त बादशहा होता!
माणसं येतील नी जातील, काळ निघून जाईल… पण चिखल गुट्टा टिकला पाहिजे, आपली रांगडी परंपरा टिकली पाहिजे!
धन्यवाद!
शब्दरचना व आठवण
जोतीराम बाबू शिंदे
८८९८९५५५९३