चिखलात रुतलेल्या पायांनाच संघर्षाची खरी जाणीव असते आणि कष्टांच्या मातीत रुजलेल्या स्वप्नांनाच यशाचा सुगंध लाभतो! माणसाच्या आयुष्याला आकार देणारी परिस्थिती असते की परिस्थितीला आकार देणारी माणसाची जिद्द असते,हा प्रश्न नेहमीच विचार करायला लावतो.प्रतिकूल परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून,संकटाच्या वादळांना न जुमानता आणि अपयशांच्या अंधारातही आशेचा दिवा तेवट ठेवून जे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात,त्यांचा जीवनप्रवास हा केवळ त्यांच्या यशाचा आलेख नसतो,तर तो पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्त्रोत असतो.जोतीराम शिंदे लिखित ‘चिखल:संघर्षाच्या पाऊलखुणा’ हे पुस्तक अशा संघर्षमय जीवनप्रवासांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारे एक महत्त्वपूर्ण व्यक्तीचित्रण आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात वसलेल्या केळेवाडीसारख्या दुर्गम भागातून सुरू झालेला अकरा व्यक्तींचा प्रवास म्हणजे ग्रामीण जीवनातील संघर्ष,कष्ट,त्याग, जिद्द आणि आत्मविश्वास यांचा जिवंत दस्तऐवज आहे.गावच्या चिखल मातीत राबणाऱ्या आई-वडिलांनी आपल्या घामाचा प्रत्येक थेंब मुलांच्या भविष्याच्या स्वप्नांसाठी खर्च केला.स्वतःच्या वाट्याला कष्टाचे भोग आले,तरी आपल्या मुलांच्या वाटेला शिक्षणाचे सुख यावे यासाठी त्यांनी आयुष्यभर अपार मेहनत घेतली.स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालून मुलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या या माता-पित्यांचे योगदान शब्दात मांडणे कठीण आहे.त्यांच्या कष्टामधूनच या अकरा व्यक्तींच्या यशाची पायाभरणी झाली.
खरे तर ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण म्हणजे केवळ शाळेतील अभ्यास नव्हे;ती असते रोजच्या जगण्याशी चाललेली एक लढाई! घरची गरिबी,अपुऱ्या सोयी-सुविधा,दळणवळणाच्या साधनांचा अभाव,शाळेपर्यंतची पायपीट आणि घरच्या कामांची जबाबदारी अशा असंख्य अडचणींना सामोरे जात या व्यक्तींनी शिक्षणाची वाट धरली.गुरेढोरे आणि शेरडे सांभाळताना फाटके कपडे आणि तुटलेल्या चपला पायात घालून त्यांनी ज्ञानाच्या दिशेने पावले टाकली.परिस्थितीने त्यांच्या पायांना काटे दिले; परंतु त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम शिक्षणाने केले.परिस्थितीपुढे शरणागती पत्करण्याऐवजी तिला आव्हान देण्याचे धाडस त्यांनी दाखवले.त्यांच्या जीवनातील हा संघर्ष आजच्या तरुण पिढीला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे.
चिखलात कमळ उमलते,कारण त्याच्या अंतरंगात उमलण्याचे उर्मी असते.त्याचप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीच्या चिखलातून वर येण्यासाठी केवळ संधीची वाट पाहून चालत नाही,तर जिद्द,बुद्धिमत्ता,परिश्रम आणि चिकाटी यांच्या बळावर स्वतःची वाट स्वतःच निर्माण करावी लागते.या अकरा व्यक्तींच्या आयुष्याकडे पाहताना या विचारांची प्रचिती येते.त्यांच्यासाठी गरिबी ही पराभवाची खूण ठरली नाही.दुर्गम गाव ही प्रगतीच्या मार्गातील कायमची भिंत ठरली नाही आणि प्रतिकूल परिस्थिती त्यांच्या स्वप्नांचा शेवट ठरू शकली नाही,उलट याच परिस्थितीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला संघर्षाचे बळ दिले आणि कष्टांच्या मुशीतून त्यांचे कर्तृत्व उदयाला आले.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की,लेखकाने केवळ यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींच्या कर्तुत्वाचे वर्णन केलेले नाही; तर त्या शिखरापर्यंत पोहोचताना त्यांनी पार केलेल्या काटेरी वाटांचाही मागोवा घेतला आहे.यशाची उंची सर्वांना दिसते; मात्र त्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी पायाखाली झिजवलेल्या वाटा,मनात दडवलेल्या भावना,डोळ्यात जपलेली स्वप्ने आणि अपयशाच्या क्षणीही न ढळलेला आत्मविश्वास यांची जाणीव फार थोड्यांना असते.जोतीराम शिंदे यांनी या व्यक्तिचित्रणातून याच अदृश्य संघर्षाला शब्दरूप दिले आहे.
या अकरा व्यक्ती आज विविध क्षेत्रात यशस्वी झाल्या आहेत.त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या,कर्तुत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे;परंतु त्यांच्या यशाचे खरे मोठेपण केवळ त्यांनी गाठलेल्या पदांमध्ये किंवा मिळवलेल्या प्रतिष्ठेमध्ये नाही.त्यांच्या यशाचे खरे मोल आहे ते त्यांनी आपल्या मातीशी जपलेल्या नात्यांमध्ये! गाव सोडले,गावच्या सीमा ओलांडल्या,व्यापक जगात स्वतःची ओळख निर्माण केली; पण ज्या मातीतून आपण उगवलो,ज्या माणसांच्या कष्टामुळे आपण घटलो आणि ज्या संस्कारांनी आपले व्यक्तिमत्व समृद्ध केले.त्या मातीशी त्यांनी आपली नाळ तुटू दिली नाही.आपल्या मुळाशी निष्ठावान राहणे हेच त्यांच्या कर्तृत्वाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
आजच्या काळात यशाची व्याख्या अनेकदा पैसा,पद,प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी यांच्या पुरती मर्यादित केली जाते.अशावेळी ‘चिखल:संघर्षाच्या पाऊलखुणा’ हे पुस्तक यशाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देते.यश म्हणजे केवळ उंच शिखर गाठणे नव्हे,तर त्या शिखराकडे जाताना आपल्या मूल्यांना,संस्कारांना आणि माणुसकीला जपणे होय.आपल्या कष्टातून उभे राहणे आणि आपल्या उभे राहण्यामागे असलेल्या हातांचे ऋण विसरु नये,ही जाणीव या व्यक्तीचित्रणातून ठळकपणे पुढे येते.या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तीची कहाणी स्वतंत्र आहे.प्रत्येकाच्या संघर्षाचे स्वरूप वेगळे आहे.वाटचालीतील अडथळे वेगळे आहेत आणि यशापर्यंत पोहोचण्याचा मार्गही वेगळा आहे.तरीही या सर्व कहाण्यांना जोडणारा एक समान धागा आहे; तो म्हणजे परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी आणि स्वप्नांवर असलेला अढळ विश्वास! या कहाण्या वाचताना वाचकाला केवळ व्यक्तींची माहिती मिळत नाही,तर ग्रामीण समाजजीवनाचे वास्तव,कुटुंबव्यवस्थेतील त्याग,शिक्षणाचे सामर्थ्य आणि मानवी जिद्दीची विलक्षण ताकद याचेही दर्शन घडते.
ग्रामीण भागातील अशा कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनाचा मागोवा घेणे ही केवळ साहित्यिक कृती नाही,तर तो समाजाप्रती व्यक्त केलेला कृतज्ञतेचा भाग आहे.समाजाच्या कानाकोपऱ्यात अनेक संघर्षकथा जन्म घेत असतात.काही काळाच्या ओघात विस्मृतीत जातात,तर काहींना शब्दांचे लेणे लाभल्यामुळे त्या अजरामर होतात.जोतीराम शिंदे यांनी या अकरा व्यक्तींच्या जीवनप्रवासाला शब्दबद्ध करून त्यांच्या संघर्षाच्या पाऊलखुणा जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.या पाऊलखुणा केवळ भूतकाळाची नोंद नाही,तर भविष्याचा मार्ग उजळवणारे दीपस्तंभ आहेत.
या पुस्तकाच्या साहित्यिक जडणघडणीत मलपृष्ठावरील माझे जिवलग मित्र व सुप्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांचा मजकूर,कविवर्य अशोक गुरव यांची अर्थपूर्ण आणि बोलकी प्रस्तावना तसेच शिवारबा प्रकाशनने केलेले प्रकाशनकार्य यांचाही उल्लेख आवश्यक आहे.पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ वाचकाला प्रथमदर्शनी आकर्षित करते; मात्र त्याच्या अंतरंगातील संघर्षकथा वाचकाच्या मनाला स्पर्श करून जातात.बाह्यरूपाची आकर्षकता आणि अंतकरणाला भिडणारा आशय यांचा सुंदर मेळ या पुस्तकाला लाभला आहे.
लेखक जोतीराम शिंदे यांनी या व्यक्तीचित्रणातून एक महत्त्वाचा संदेश दिला आहे…जन्म कुठे झाला,परिस्थिती कशी होती आणि वाटेत किती अडथळे आले, यापेक्षा त्या परिस्थितीशी आपण कसे लढतो हे अधिक महत्त्वाचे असते.दुर्गम भागात जन्माला येणे हा कुणाचाही दोष नाही.आणि गरिबीत वाढणे हा कुणाच्याही कर्तृत्वाचा अडसर ठरायला नको.योग्य शिक्षण,कुटुंबाचा त्याग,स्वतःची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी यांच्या बळावर सामान्य माणूसही असामान्य यश मिळवू शकतो,याची साक्ष या व्यक्तींचे जीवन देते.विशेषत: आजच्या तरुण पिढीने या पुस्तकातील संघर्षकथा वाचणे गरजेचे आहे.सुविधा असूनही निराश होणाऱ्या,अपयशाने खचणाऱ्या किंवा अडचणींना कारणे बनवणाऱ्या तरुणांना या कहाण्या नव्याने उभे राहण्याची प्रेरणा देतील…
या पुस्तकाला आणि त्यातील संघर्षातून उमललेल्या प्रत्येक कर्तुत्वाला व लेखकमित्र जोतीराम शिंदे यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा!
‘इपळाप’कार- नंदू साळोखे.
मो.नं.9545691541