डोंगरांच्या कडेकपारीत वसलेलं, अवघ्या ४०० लोकवस्तीचं भुदरगडमधलं केळेवाडी हे एक छोटंसं गाव. जिथे रोजचा दिवस उगवतो तोच मुळी कसल्या ना कसल्या संघर्षाने. पण याच मातीच्या कुशीत जपलेली लोककला, निष्ठा आणि ढोल-लेझिमचा जल्लोष आता थेट मायानगरी मुंबईला दणाणून सोडण्यासाठी सज्ज झाला आहे.
कै. धनाजीराव शिंदे तरुण मंडळ, केळेवाडी प्रेरित ‘विठ्ठल रुक्मिणी लेझीम पथक’ येत्या १६ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि ज्याची अख्खी मुंबई आतुरतेने वाट पाहते, त्या ‘काळाचौकीचा महागणपती’ आगमन सोहळ्यात आपली कला सादर करणार आहे.
मातीतील कष्टकरी जेव्हा मायानगरीत अवतरतात…
या पथकाची खरी ताकद आणि कौतुक कशात आहे माहितीय? या पथकातला प्रत्येकच्या प्रत्येक कलाकार हा शेतकरी आहे! वयाची ३३ ते तब्बल ७० वर्षे गाठलेले हे सगळे मातीचे भुमीपुत्र. भल्या पहाटे उठून रानात राबणे, शेतीची कामे उरकणे, जोडधंदा म्हणून गोठ्यातली जनावरं सांभाळणे आणि ही सगळी ओढाताण सांभाळून रात्रीच्या वेळी लेझीमचा सराव करणे… हा प्रवास सोपा नव्हता.
ज्या हातांनी दिवसभर नांगर धरला, गवत कापलं आणि दुधाच्या चरव्या उचलल्या, तेच हात जेव्हा लेझीमची कडी वाजवतील, तेव्हा तो केवळ एक परफॉर्मन्स नसेल; ती या कष्टकऱ्यांच्या जिद्दीची गर्जना असेल. वय हे फक्त आकडा असतं, हेच जणू ७० वर्षांच्या आजोबांपासून ३३ वर्षांच्या तरुणांपर्यंत सगळ्यांनी आपल्या उत्साहातून सिद्ध केलं आहे.
परंपरा, वारसा आणि जिद्दीची सांगड
गावाने जपलेली एकजूट आणि मिळालेली प्रेरणा यांच्या जोरावर या ४०० लोकवस्तीच्या केळेवाडीने ही स्वप्नवत भरारी घेतली आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी माथा टेकवून सुरु झालेली ही साधना आज एका सुवर्णक्षणाची साक्षीदार होत आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून उठलेला तो झांजांचा आणि ढोल-ताशांचा आवाज जेव्हा मुंबईच्या काळाचौकीच्या रस्त्यांवर दणाणून उठेल, तेव्हा उपस्थितांचे डोळे या रांगड्या गुणवत्तेकडे थक्क होऊन पाहतील.
ही गोष्ट आहे रानावर पोट असणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या संस्कृतीसाठी आणि कलेसाठी मारलेल्या उत्तुंग छलांगची! १६ ऑगस्टला जेव्हा काळाचौकीत ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर होईल, आणि त्या गजरात जेव्हा या शेतकऱ्यांची लेझीम खणखणेल, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र केळेवाडीच्या या लेकरांना डोक्यावर घेईल.
आपल्या गावाचं नाव, आपली परंपरा आणि आपली कला महाराष्ट्राच्या पटावर सुवर्णअक्षरांनी कोरण्यासाठी निघालेल्या ‘विठ्ठल रुक्मिणी लेझीम पथका’तील सर्व शेतकरी भावांना मनापासून शुभेच्छा!
जा, आणि तुमच्या रांगड्या ताकदीने मुंबई जिंकून या!
जोतीराम बाबु शिंदे