आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात आणि पुढे निघून जातात, पण काही माणसं मनाच्या कोपऱ्यात कायमचं ठाण मांडून बसतात. २००९ ते २०१२ हा माझ्या डिप्लोमाच्या शिक्षणाचा काळ माझ्यासाठी अत्यंत खडतर होता. परिस्थितीची झळ तीव्र होती, हातात भविष्याची अनिश्चितता होती आणि मनात स्वप्नांचा मोठा पसारा… अशा वेळी महाविद्यालयाच्या गजबजाटात मन नकळतपणे आपल्यासारख्याच परिस्थितीतून जाणाऱ्या, साध्या आणि निस्वार्थी मनाचा शोध घेत असतं. त्याच शोधात मला गवसलेला, चंदगडच्या नागणवाडी गावचा किरण गावडे! अतिशय हुशार, शांत, समंजस आणि अगदी जिवाभावाचा मित्र. त्या हलाकीच्या दिवसांत एकमेकांना दिलेला मानसिक आधार हाच आमच्या मैत्रीचा खरा पाया होता.
डिप्लोमा संपला आणि रोजच्या जगण्याच्या शर्यतीत आम्हा दोघांच्या वाटा बदलल्या. वेळेचं चक्र फिरत राहिलं आणि एकमेकांशी असलेला थेट संपर्क हळूहळू सुटत गेला. गेल्या १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत आमची भेट झाली ती फक्त दोनच वेळा—एक माझ्या लग्नाच्या विशेष प्रसंगी आणि दुसऱ्यांदा २०२० मध्ये, जेव्हा तो आधीपासूनच पुण्यात होता आणि मी माझ्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने पुण्यात आलो होतो तेव्हा. पण म्हणतात ना, खऱ्या नात्यांवर काळाची आणि अंतराची पुसटशीही धूळ बसू शकत नाही. अंतराने कितीही मैल वाढवले तरी मनातील आपुलकीची उब तशीच राहते.
आज मी लिहिलेले प्रत्येक लेख तो अतिशय प्रेमाने आणि आवर्जून वाचतो. अलीकडेच मी एका पुस्तकाचा अभिप्राय लिहिला होता, तो वाचून त्याच्या भावना चाळवल्या गेल्या. भावाने वेळ न दवडता लगेच फोन केला आणि एकाच ओळीत आपुलकीने विचारलं—”वेळ आहे का, भेटूया?” त्याच्या त्या एका शब्दाने जुन्या आठवणींचा बांध फुटला, मीही क्षणाचाही विचार न करता लगेच ‘हो’ कळवला.
भेटलो… आणि १४ वर्षांचा दुरावा एका क्षणात विरघळून गेला. काळाचे सगळे पदर गळून पडले आणि आम्ही पुन्हा एकदा तेच डिप्लोमाचे दिवस जगू लागलो. जुन्या आठवणींना उजाळा दिला, भूतकाळातील त्या संघर्षाच्या क्षणांना आठवून हसलो-गहिवरलो. एकत्र हॉटेलमध्ये जेवलो, सुख-दुःखाच्या गप्पा मारल्या आणि या सुंदर क्षणाला कायमचं कैद करण्यासाठी एक फोटो काढला—म्हटलं, भविष्यात कधीतरी या निखळ मैत्रीवर लिहिण्यासाठी ही आठवण सोबत असावी.
आयुष्याच्या या धावपळीत जुन्या मित्राची अशी अचानक झालेली भेट मनाला पुन्हा नव्याने उभारी देऊन जाते. जगात कितीही गोष्टी बदलल्या, तरी जुन्या मित्राच्या पाठीवरची ती हक्काची थाप आणि त्याच्या डोळ्यांतील आपुलकी कधीच बदलत नाही.
जोतीराम बाबु शिंदे
