आज पुण्यात ३१ डिसेंबरची रात्र आहे… खिडकीबाहेर रंगीबेरंगी फटाक्यांची आतिशबाजी सुरू आहे, मोठ्या हॉटेल्समधून बेसचा आवाज येतोय, आणि माझ्या हातातल्या फोनवर ‘न्यू इयर पार्टी’चे शेकडो मेसेज फ्लॅश होत आहेत. पण माझं मन मात्र इथं नाहीये. माझं मन आज थेट भुदरगडच्या त्या डोंगररांगांमध्ये आणि केळेवाडीच्या माझ्या शेतातल्या धुऱ्यावर जाऊन बसलंय, जिथे कधीकाळी माझ्या आयुष्यातली सर्वात श्रीमंत पार्टी झाली होती.
ती ५-१० रुपयांची श्रीमंती अन् थम्स अपची मजा
आज पुण्यात खिशात क्रेडिट कार्ड्स आहेत, पगार झाला की हव्या त्या हॉटेलमध्ये टेबल बुक करण्याची ऐपत आहे. पण आजही त्या ‘१० रुपयांच्या वर्गणी’ची ओढ काही संपत नाही. केळेवाडीत असताना आम्ही मित्र आठवडाभर आधी पैसे गोळा करायला सुरुवात करायचो. कोणाकडे १० रुपये नसले तर आम्ही बाकीचे दोन-दोन रुपये जास्त टाकून त्या मित्राला सामील करून घ्यायचो. त्या पैशातून आणलेली चिकनची पिशवी आणि सोबतीला असलेली ‘थम्स अप’ची ती काचेची बाटली… तेव्हा ते थम्स अप म्हणजे आमच्यासाठी जगातलं सगळ्यात मोठं कोल्ड्रिंक होतं. एका बाटलीत पाच-सहा जण वाटून पिताना जो आनंद मिळायचा, तो आजच्या महागड्या शॅम्पेनमध्येही नाही.
घरातून आणलेली भाकरी अन् तीन दगडांची चूल
पार्टी शेतात असायची, पण आम्ही कोणीच हॉटेलवर अवलंबून नसायचो. आम्ही सर्वजण आपापल्या घरातून आईने प्रेमाने बांधून दिलेली भाकरी घेऊन यायचो. शेतात गेल्यावर तीन दगड शोधून चूल मांडली जायची. भुदरगडची ती कडाक्याची थंडी, लाकडं ओली असली की फुंकणीने फुंकून डोळे लाल व्हायचे, पाणी यायचं… पण तो धूर आजच्या परफ्यूमपेक्षा कितीतरी पटीने सुगंधी होता. त्या चुलीवरच्या काळपट कढईत जेव्हा गावरान रस्सा उकळायचा आणि त्यात आम्ही घरातून आणलेली ती भाकरी कुस्करून खायचो, तेव्हा त्या चवीसमोर जगातील सर्व पक्वान्न फिकी वाटायची.
गप्पा आणि निखळ मैत्री
शेकोटीभोवती बसून आम्ही काय काय गप्पा मारायचो! भविष्याची स्वप्नं पाहायचो, एकमेकांच्या खोड्या काढायचो. तिथे मोबाईल नव्हते, फोटो काढायची घाई नव्हती, फक्त ‘आम्ही’ होतो आणि आमचा तो ‘वेळ’ होता. आज ते सर्व हरवलंय असं वाटतं.
आजची खंत…
आज पुण्यातल्या एसी रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर त्या चुलीच्या ऊबेची आणि केळेवाडीतल्या माझ्या मित्रांच्या सोबतीची खूप उणीव भासते. आज जेवणं ‘फाईव्ह स्टार’ आहेत, पण सोबतीला ते जुने जिवलग मित्र नाहीत. कुणी कुठे गेलं, कुणी कामासाठी विखुरलं, तर कुणी माझ्यासारखं शहरातल्या नोकरीत अडकून पडलं.
पैसा तर खूप कमावला साहेब, पण ती ‘१० रुपयांची पार्टी’ आणि तो थम्स अपचा घोट पुन्हा मिळवणं आता अशक्य आहे. आज ३१ डिसेंबरच्या रात्री बाल्कनीत उभा असताना डोळ्यांत पाणी येतंय, कारण नोकरीच्या शर्यतीत मी बरंच काही कमावलंय, पण माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं सुख मात्र माझ्या गावच्या मातीतच सोडून आलोय.
लेखक: जोतीराम बाबु शिंदे,
८८९८९५५५९३
4 comments
हे लिखाण वाचताना कुठेही अभिनय वाटत नाही, ते अगदी आपलंसं वाटतं.
गावची माती, मित्रांची साथ, चुलीची ऊब आणि थम्स अपचा तो घोट — सगळं जिवंत उभं राहतं.
आजच्या झगमगाटात हरवलेली ती साधी पण खरी खुशी मनाला हळूच चटका लावून जाते.
खूप कमी शब्दांत मोठं सत्य सांगणारं, मनातून आलेलं लिखाण आहे.
Khup mast
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😓
खूप छान आणि अप्रतिम वर्णन, आज ही लेख वाचला की त्या जुन्या आठवणी आहे तश्या जाग्या होतात, आधीच्या काळी आम्ही तर लहान असताना 31st ची पार्टी म्हणजे 2 3 रुपये काढून चिरमुरे फरसाण आणि घरातून हळूच चोरून आणलेले कांदे याची आठवण होते. त्या नंतर काळ बदलत गेला मग जेवण, चिकन रस्सा याची मेजवानी देखील काही निराळी च होती.
पण आता AC, पब्स आणि इव्हेंट मधील पार्टी ला त्याची सर मात्र येत नाही