[विशेष वृत्तात : रुरल स्टोरी (ruralstory.in)]
नशिबाने ज्यांच्या ताटात फक्त संघर्षच वाढला होता, त्यांनी आज सातासमुद्रापार यशाचा घास घेतला आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील पांगिरे गावच्या एका छोट्याशा अंधाऱ्या खोलीतून निघालेला मुलगा जेव्हा मेक्सिकोच्या विमानाने झेप घेतो, तेव्हा ती गरिबीच्या छाताडावर पाय देऊन एका लेकाने आपल्या आईच्या कष्टाला दिलेला जागतिक मुजरा ठरतो. हा थक्क करणारा प्रवास पहा:
१९९१ ची ती काळी रात्र: संसार उघड्यावर आला
१९९१ मध्ये प्रकाशजींचे सहा चुलते विभक्त झाले आणि त्यांच्या शेतकरी वडिलांच्या वाट्याला आली ती फक्त एक छोटीशी अंधारी खोली आणि पाच भांडी! दोन-तीन ताटे आणि पाच भांडी… एवढ्या तुटपुंज्या सामानावर संसाराचा गाडा ओढताना आई-वडिलांनी जे हाल सोसले, ते पाहून आजही प्रकाशजींच्या काळजात कालवाकालव होते.
तांदळाची ‘अश्रूयुक्त’ साखर आणि आईचा तो फाटका पदर
घरात पाहुणे आले की चहासाठी साखर नसायची. अशावेळी आई कोपऱ्यातला मूठभर तांदूळ आपल्या फाटक्या पदरात बांधून प्रकाशच्या हातात द्यायची आणि हुंदका आवरत सांगायची, “राजा, दुकानात जा, हा तांदूळ विक आणि पाहुण्यांच्या चहासाठी साखर घेऊन ये.” त्या साखरेची गोडी आजही प्रकाशजींच्या मनात जिवंत आहे.
बहिणीचे अनवाणी पाय: चपलेविना जळलेले तळवे
प्रकाशजींच्या मोठ्या बहिणीला दहावीपर्यंत साधी चप्पल सुद्धा नशिबात नव्हती. भर उन्हात तापलेल्या जमिनीवर अनवाणी पायाने ती माऊली दिवाळीच्या सुट्टीत लोकांच्या शेतात राबायची. स्वतःचे तळवे भाजून ती चार पैसे आईच्या हातावर ठेवायची, जेणेकरून भावांच्या शिक्षणाची फी भरता येईल. या तिन्ही भावंडांनी अवघ्या एकाच कंपास पेटीवर आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केले.
जेव्हा भरल्या घरातून ‘पाण्याचा हंडा’ उचलून नेला गेला…
बहिणीच्या लग्नासाठी घेतलेल्या १५०० रुपयांच्या कर्जाचे व्याजासह २५ हजार झाले होते. एके दिवशी पतसंस्थेचे लोक दारात आले आणि थकबाकीसाठी घरातील भरलेला पाण्याचा हंडा सर्वांसमोर उचलून घेऊन गेले. भरल्या घरातून पाण्याचा हंडा नेला जाणे, हा त्या कुटुंबाच्या सन्मानावर झालेला सर्वात मोठा घाव होता. आईकडे सोन्याचा एकही मणी उरला नव्हता, ती कोणाच्या लग्नाला जाताना आपला रिकामा गळा पदराआड लपवून कोपऱ्यात उभी राहायची.
मोठ्या भावाचा ‘काळा’ पडलेला हात आणि पहिली सायकल
मोठ्या भावाने स्वतःच्या स्वप्नांची होळी केली आणि दहावीत असतानाच ट्रॅक्टरचे ड्रायव्हिंग करून घराला आधार दिला. दिवस-रात्र उन्हात राबून भावाचे हात काळे पडले होते. आपल्या पहिल्या पगारातून भावाने प्रकाशला नवी सायकल घेतली. आज त्याच भावाकडे दोन ट्रॅक्टर डौलात उभे आहेत.
शिक्षणासाठी गावाने सावरलेली ‘पाखरण’
१० वी मध्ये ५४% मिळाले, पण गरिबीमुळे पुढची दारं बंद होणार होती. तेव्हा गावातील पांडुरंग भाटले यांनी आयटीआयचा सल्ला दिला. गारगोटी गव्हर्मेंट आयटीआयमध्ये प्रवेश मिळाला. बस पाससाठी आईच्या मैत्रिणींनी स्वतःच्या पदराला गाठ मारून पैसे गोळा केले. या प्रवासात पाटील सर, भांडे मॅडम आणि आयटीआयमध्ये सुतार सर यांनी प्रकाशजींना लेकरासारखं सावरलं.
वयाच्या १६ व्या वर्षी ९४० रुपयांचा वनवास
पोटाची खळगी भरण्यासाठी अवघ्या १६ व्या वर्षी प्रकाशजींनी घर सोडलं. इचलकरंजीच्या पार्वती इंडस्ट्रीमध्ये दत्तात्रय भाटले यांच्या ओळखीने ९४० रुपये पगारावर अप्रेंटिस मिळाली. ४५० रुपये रूम भाडे व कोल्हापूर क्लासचा खर्च वजा जाता प्रकाशजींच्या हातात काहीच उरायचे नाही.
‘देवमाणूस’ चंदू शेंडगे आणि माऊलीने दिलेला मायेचा घास
पहाटे ४ वाजता सायकल मारून बस स्टँड गाठणाऱ्या प्रकाशचा रिकामा डबा पाहून मित्र चंदू शेंडगे आणि त्यांच्या माऊलीने प्रकाशला दीड वर्ष स्वतःच्या घरी पोटभर जेवण दिले. चंदूच्या आईने कधीच पैसे मागितले नाहीत, त्यांनी एका परक्या मुलात आपला स्वतःचा मुलगा पाहिला.
टाटा मोटर्स: अपमानाचा बदला आणि आईचं सोनं
कॅम्पस सिलेक्शनद्वारे प्रकाशजींची निवड टाटा मोटर्स (पिंपरी-चिंचवड) येथे झाली. ६७७६ रुपये पगारावर काम करताना त्यांनी सर्वात आधी तो ‘हंडा’ नेणाऱ्या संस्थेचे कर्ज नील केले आणि दुसऱ्या पगारातून आईला सोन्याचे दागिने करून दिले. रिकामा गळा पदराआड लपवणाऱ्या आईला जेव्हा प्रकाशजींनी सोनं घातलं, तेव्हा त्या माऊलीचं काळीज भरून आलं.
दक्षिण कोरिया: साध्या सायकलवरून थेट विमानात!
‘डान्सिंग’ कंपनीने प्रकाशजींना दक्षिण कोरियाला ट्रेनिंगसाठी पाठवले. साधी सायकल चालवणारा पांगिरेचा मुलगा जेव्हा सातासमुद्रापार विमानातून उतरला, तेव्हा त्यांना जाणीव झाली की जिद्दीच्या जोरावर जग जिंकता येतं.
इंजिनीअरिंगची जिद्द आणि ‘भगत सरांचे’ प्रोत्साहन
नोकरीत पदवी नसल्याने प्रमोशन थांबले होते. १० वर्षांच्या गॅप नंतर त्यांनी १२ वी पूर्ण केली. Fleetguard Filters कंपनीतील भगत सर यांनी प्रकाशजींचे टॅलेंट ओळखले आणि त्यांना इंजिनीअरिंग पूर्ण करण्याचं बळ दिलं. २०२५ मध्ये प्रकाशजींनी इंजिनीअरिंग पूर्ण केले आणि आज ते ‘प्रोडक्शन इंजिनीअर’ पदावर पोहोचले आहेत.
संदीप आराखडे आणि एकनाथ गोसावींचा ‘जुना पलंग’
२०१४ मध्ये लग्नानंतर अवघ्या ८ दिवसात घर खाली करावे लागले. संदीप आराखडे यांनी ६ वर्षे भाड्याने घर दिले. पावसाचं पाणी गळायचं, तेव्हा एकनाथ गोसावी यांनी आपल्या लग्नातील जुना पलंग त्यांना झोपण्यासाठी दिला. या सर्व अपमानांतूनच २०१७ मध्ये प्रकाशजींनी स्वतःचे सुंदर घर उभे केले.
आई: विहिरीचा गाळ काढणारी ‘जिद्दी’ माऊली
प्रकाशजींच्या आईने संसारासाठी हासुरे येथे जाऊन विहिरीचा गाळ काढण्यापासून ते शेतात पुरुषांच्या बरोबरीने राबण्यापर्यंत अफाट कष्ट केले. आईच्या हातात ‘यश’ होते, तिने दूध डेअरीत पहिला क्रमांक मिळवला होता. दुर्दैवाने, २०२१ मध्ये आईने साथ सोडली.
मेक्सिकोची गरुडझेप: भगत सरांचा जागतिक विश्वास
प्रकाशजींचा अनुभव पाहून Fleetguard Filters कंपनीचे भगत सर यांनी त्यांना मेक्सिकोमध्ये उघडणाऱ्या नवीन प्लांट सेटअपची सर्वात मोठी जबाबदारी दिली आहे. ज्या घराचा ‘हंडा’ जप्त झाला होता, त्याच घराचा लेक आता मेक्सिकोत भारताचा झेंडा रोवणार आहे.
संघर्षाचं सार्थक झालं!
आज प्रकाशजींकडे स्वतःचे घर, गाडी आणि जागतिक ओळख आहे. दोन मुले आणि भावाच्या दोन मुली असा सुखी संसार आहे. पत्नीची खंबीर साथ आणि आई-वडिलांच्या पुण्याईने हे शिखर सर झाले आहे.
सातासमुद्रापार जाताना त्यांच्या मनात आजही पांगिरेची ती माती आणि आईने पदरात बांधलेला तो मुठभर तांदूळ जिवंत आहे.
अशा या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, आईच्या कष्टाचे आणि मित्रांच्या माणुसकीचे सोने करणाऱ्या कोल्हापूरच्या वाघाला ‘रुरल स्टोरी’ (ruralstory.in) कडून मानाचा मुजरा!
लेखक: जोतीराम बाबु शिंदे
विशेष सौजन्य: RuralStory.in
19 comments
जबरदस्त कहानी आणि लेखन ही तितक्याच ताकदीचे…Really great 👍
Thank you sandesh dada
प्रकाश प्रवास मी जवळून पाहत आहे… त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
Great achievement ghotne Saheb💐💐🎊🎊💐💐
Your parents always Good blessings you….
Great Prakash keep it.. congratulations for new responsibility…
अतिशय प्रेरणादायी संघर्षकथा 🙏
शून्यातून शिखर गाठणाऱ्या प्रकाशजींच्या जिद्दीला, आईच्या अपार कष्टांना आणि माणुसकी जपणाऱ्या मित्रांना सलाम! अशी माणसंच खऱ्या अर्थाने यशाची व्याख्या बदलतात. 💐
संघर्षमय जीवनातून उजाड लेला….प्रकाश….जी
स्वप्न पाहणारे अनेक असतात, पण त्यासाठी झटणारेच इतिहास घडवतात.
मी प्रकाश ला सन 2010 पासून डोंगशिन मध्ये कामाला होता तेव्हापासून ओळखतो,हुशार आणि काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द बाळगणारा, डोंगशिन मध्ये परमनंट असूनही त्याने नोकरी सोडली व आज उत्तुंग यश संपादन केले,लेख वाचताना जुन्या आठवणनींना उजाळा मिळाला,प्रकाशला पुढील वाटचाली साठी सदिच्छा आणि शुभेच्छा 🙏
✨💫🎉💐💐
प्रकाश आणि माझी मैत्री २००८ मध्ये dongshin motech कंपनीत झाली त्या वेळी पासुन आज पर्यंत आम्ही मित्र आहे… कोरियात आम्ही बरोबरच होते… प्रकाश मध्ये जिद्द व चिकाटी खुप आहे…त्याला नविन गोष्टी शिकण्याची आवड आहे… खुप मेहनत करतो… वेळोवेळी मित्रांच्या सहवासात राहतो… प्रकाश बद्दल बोलण्यासारखे खुप आहे पण आज त्यांचे हे यश पाहून आम्हाला त्याचा खुप अभिमान वाटत आहे… पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
माझा भाचा आणि विद्यार्थी म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतो.लहानपणापासून शांत, हुशार, मनमिळाऊ असून सर्वाशी नम्रतेने वागणारा प्रकाश. खरोखरच आपल्या जिद्दीच्या आणि कष्ट्याच्या जोरावर आजचे दिप्तीमान यश प्राप्त केलेस. तुझ्या यशाला सलाम . यापुढे ही तूला यशाची उतुंग शिखरे पार करण्यासाठी अखंड शुभशिर्वाद
Very nice 👌 & all the best
प्रकाश तुम्ही पार्वती इंडस्ट्रीज मध्ये अप्रेंटीशीपला होता त्यावेळेला मी तुमच्या हाताखाली हेल्पर होते
त्यावेळेला तुम्ही मला सांभाळून घेतला मी अजून विसरलो नाही
प्रकाश तुम्ही पार्वती इंडस्ट्रीज मध्ये अप्रेंटीशीपला होता त्यावेळेला मी तुमच्या हाताखाली हेल्पर होते
त्यावेळेला तुम्ही मला सांभाळून घेतला मी अजून विसरलो नाही
आम्ही एकत्र कधी कंपनीमध्ये काम केले नसले तरी, साधी राहणी आणि मुखात गोड वाणी यामुळे प्रकाश यांनी खुप मित्र बनविले आहेत.
So incredibly. We are lucky to have Prakash with us as most valuable team member .
Thank you all members 🙏
Thank you Bhagat Sir