आजकाल आजूबाजूला पाहिलं की शिक्षणक्षेत्रात बरंच काही बदललेलं दिसतं. मोठ्या, चकचकीत इमारती, महागडी फी, डिजिटल स्क्रीन… सगळं काही कसं एकदम ‘प्रोफेशनल’ झालंय. पण या चकाचक दुनियेत कुठेतरी एक कोरडेपणा जाणवतो. आजच्या या बदललेल्या, कृत्रिम जगाकडे पाहिलं की मनाच्या एका कोपऱ्यात दडलेली बालपणाची ती कौलारू शाळा आणि माझ्या आयुष्याची पहिली वीट रचणाऱ्या एका माणसाची खूप तीव्रतेने आठवण येते—ते म्हणजे आमचे महेश शंकर लाड गुरुजी.
लाड गुरुजी आम्हाला पहिली ते चौथीपर्यंत होते. खरं सांगायचं तर, बालपणाची ती चार वर्ष म्हणजे आमच्या संपूर्ण आयुष्याची सर्वात महत्त्वाची वर्ष होती. गुरुजींनी केवळ आम्हाला पुस्तकं शिकवली नाहीत, तर आमचा आयुष्याचा पाया खऱ्या अर्थाने घट्ट केला. ते शाळेत शिक्षक म्हणून आले, पण आमच्यासाठी ते कधी ‘सर’ वाटलेच नाहीत; तर आमच्या घरातलीच एखादी छत्रछायेसारखी वडीलधारी व्यक्ती वाटायचे. त्यांचं ते प्रेम, ती मायेची जरब आणि पाठीवर पडणारा तो हक्काचा हात… यामुळे शाळा हे कधी घरावेगळं ठिकाण वाटलंच नाही.
त्यांच्या अनेक आठवणी आजही काळजात जशाच्या तशा ताज्या आहेत. गुरुजींनी वर्गात त्यांचं आवडतं “वांडर रे वांडर…” हे गाणं सुरू केलं की आम्हा पोरांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारायचा. ते गाणं म्हणताना सरांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि आम्ही हरखून गात असलेले ते सूर… आज इतक्या वर्षांनंतरही ते गाणं आठवलं की थेट प्राथमिक शाळेच्या त्या वर्गात गेल्यासारखं वाटतं आणि डोळे नकळत पाणावतात.
गुरुजींचं मूळ गाव ‘मुरुकटे’. पण पुढे काळ बदलला, शाळा सुटली, आम्ही पोटापाण्याच्या मागे लागलो आणि गुरुजींशी असलेला संपर्क तुटला. आज ते कुठे असतात, कसे आहेत, काहीच माहिती नाही. अगदी त्यांचा फोन नंबरही माझ्याकडे नाही, याची मनाला एक मोठी सल कायम टोचत राहते. ज्या माणसाने आयुष्य जगायला शिकवलं, आज त्यांचा साधा शोधही घेता येत नाहीये, हे मन स्वीकारू शकत नाही.
आज रस्ते झाले, इमारती झाल्या, सोयी-सुविधा झाल्या, पण माणसामाणसांमधला आणि शिक्षक-विद्यार्थ्यांमधला तो जुना जिव्हाळा कुठेतरी हरवून गेलाय. आजची ही बदलेली दुनिया पाहिली की, लाड गुरुजींसारख्या निस्वार्थी आणि वडिलांच्या मायेने सांभाळणाऱ्या गुरूंची खूप आठवण येते.
गुरुजी, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुमच्या या विद्यार्थ्याचा तुम्हाला साष्टांग नमस्कार! तुम्ही दिलेले संस्कार आणि अक्षरांचा तो भक्कम पाया आज मी आयुष्यात जिथे कुठे आहे, तिथे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
माझी या लेख वाचणाऱ्या सर्वांना एक नम्र विनंती आहे…
मुरुकटे गावचे आमचे हे लाड गुरुजी (महेश शंकर लाड) सध्या कुठे आहेत, याबद्दल जर कोणाकडेही काही माहिती असेल किंवा कोणाचा त्यांच्याशी संपर्क असेल, तर प्लीज माझ्याशी संपर्क साधा. त्यांच्यापर्यंत हा लेख नक्की पोहचवा.
लेखक: जोतीराम बाबु शिंदे