माणूस आयुष्यात कितीही मोठा झाला, शहरात गेला, तरी आपल्या बालपणाची शाळा आणि पहिली-दुसरीत पाठीवर पडलेला मायेचा हात कधीच विसरत नाही. आज मी आयुष्यात कुठल्याही हुद्द्यावर असलो, तरी जेव्हा केव्हा केळेवाडी गावची आणि बालपणाची आठवण येते, तेव्हा डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो—ते म्हणजे आमचे प्रकाश कांबळे सर. आजच्या या बदललेल्या, पैशाभोवती फिरणाऱ्या जगात वावरताना सरांनी दिलेली ती मायेची ऊब काळजात आजही तशीच जिवंत आहे.
माझं प्राथमिक शिक्षण केळेवाडीच्या ‘वी. म.’ शाळेत झालं. त्या काळात आमच्या गावाला साधा धड रस्ताही नव्हता. पावसाळा सुरू झाला की गावाची पार दैना व्हायची. लाल चिखलातून पाय काढता काढता नाकी नऊ यायचे. अशा परिस्थितीतही आमचे कांबळे सर कधी थकले नाहीत की “रस्ता खराब आहे” म्हणून त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही. गावाला रस्ता नाही हे माहीत असूनही, सर दररोज ‘अरळगुंडी’वरून मैलोन्मैल चिखल तुडवत पायी चालत आमच्या शाळेत यायचे. ती चिखला-मातीने माखलेली सरांची पावलं फक्त शाळेकडे येत नव्हती, तर आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या गरिबांच्या पोरांच्या अंधाऱ्या भविष्याला उजेडाकडे नेणारा तो एक प्रामाणिक रस्ता होता.
मी जेव्हा पहिली-दुसरीत होतो, तेव्हा घराची सवय सुटलेली नसल्याने शाळेची फार भीती वाटायची, डोळ्यात पाणी यायचं. पण शाळेत पाऊल ठेवलं की एक हक्काची आणि हसणारी जागा असायची, ती म्हणजे कांबळे सरांची कुशी. आजच्या डिजिटल आणि कडक शिस्तीच्या शिक्षण पद्धतीत कदाचित कोणी याचा विचारही करणार नाही, पण कांबळे सर आम्हाला नेहमी आपल्या मांडीवर बसवून अगदी हसतखेळत शिकवायचे. अरळगुंडीवरून तेवढ्या दुरून चालत आल्याचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसायचाच नाही. उलट, त्यांनी मांडीवर बसवून पाठीवरून हात फिरवला की आम्ही घरची आठवण विसरून पाटी-पेन्सिल घेऊन अभ्यासात रमून जायचो.
जेव्हा आमचा लहानगा हात पाटीवरचा खडू धरायला थरथरायचा, तेव्हा सर स्वतःचा मोठा, आश्वासक हात आमच्या हातावर ठेवायचे आणि आमच्याकडून ‘अ’, ‘आ’चे वळण गिरवून घ्यायचे. ते फक्त पाटीवरचं अक्षर गिरवणं नव्हतं सर, तर तुम्ही आमच्या आयुष्याचा पाया पक्का करत होता. सरांना संगीताची भारी आवड. त्यांनी वर्गात ती जुनी सूरपेटी समोर ओढली आणि तिच्यावर हात फिरवला की आम्हा पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असायचा. त्या सूरपेटीच्या सुरांसोबत आमचे लहान बालआवाज जोडले जायचे. सरांनी गाण्यासोबतच जीवनाचे सूर कसे जोडायचे, हे कधी शिकवून टाकलं ते आमचं आम्हालाच कळलं नाही.
कांबळे सरांकडे पाहून कधीच असं वाटलं नाही की ते एक पगारी नोकर म्हणून किंवा फक्त ड्युटी म्हणून शाळा शिकवत आहेत. ते आम्हाला स्वतःच्या मुलासारखं सांभाळायचे. मला आजही चांगलं आठवतंय, घरात पैशाची चणचण असताना माझ्या शाळेची साधी ५ रुपये फी भरायलाही अडचण झाली होती. तेव्हा सरांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता स्वतःच्या खिशातून माझी ती ५ रुपये फी भरली होती. आज ती ५ रुपयांची किंमत काहीच वाटणार नाही, पण त्या काळी त्या ५ रुपयांनी माझ्या शिक्षणाचा आणि स्वाभिमानाचा रस्ता तुटू दिला नव्हता. चूक झाली तर मायेने कान पिरळणं आणि चांगलं केलं तर पाठीवर धपकरकन कौतुकाची थाप देणं, यात सरांचा कधीही स्वतःचा स्वार्थ नव्हता.
वेळ बदलली, आम्ही मोठे झालो आणि शाळा सोडून २० वर्षं उलटून गेली. पण सरांनी पेरलेलं प्रेमाचं बीज आमच्या मनात कायम होतं. गेल्या ३-४ वर्षांपूर्वी आम्ही गावकऱ्यांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी मिळून लोकवर्गणीतून शाळेसमोर एक चांगलं मैदान तयार करण्याचं ठरवलं. शाळा सोडल्यानंतर तब्बल २० वर्षांनी मी सरांना एक मेसेज केला आणि सांगितलं, “सर, आम्ही आपल्या शाळेसाठी मैदान बनवतोय.” विश्वास ठेवा, पुढच्याच क्षणी सरांनी कोणताही विचार न करता त्या मैदानासाठी स्वतःहून मदतीचा हात पाठवला! वीस वर्षांनंतरही आपल्या विद्यार्थ्याच्या हाकेला एका क्षणात ओ देणारा असा गुरु आजच्या जगात शोधूनही सापडणार नाही.
आज गावात रस्ते झालेत, गाड्या आल्यात, सगळ्या सुविधा झाल्यात… पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं ते जिव्हाळ्याचं, रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असलेलं नातं कुठेतरी हरवलंय असं वाटतं. आजच्या या धावपळीच्या आणि कृत्रिम जगात जेव्हा जेव्हा कांबळे सरांसारखा देवमाणूस आठवतो, तेव्हा खरंच डोळे भरून येतात.
सर, तुम्ही दिलेली ती मांडी, तो मायेचा हात, ती सूरपेटी, अरळगुंडीवरून येणारी तुमची ती पाऊलवाट, माझ्या हक्काने भरलेली ती ५ रुपयांची फी, मैदानासाठी तुम्ही पाठवलेली ती धावून आलेली मदत आणि अक्षरांसोबत दिलेले संस्कार… आज मी आयुष्यात जिथे कुठे आहे, तिथे माझ्यासोबत आहेत. आजच्या या बदललेल्या जगात तुमची खूप, खूप आठवण येतेय सर! तुमच्यासारखा गुरु मिळायला खरंच पूर्वपुण्याई लागते. परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य देवो आणि तुमचं छत्र आमच्यावर असंही कायम राहो, हीच देवाकडे प्रार्थना!
लेखक: जोतीराम बाबु शिंदे