साहित्य, पुस्तके आणि आपली समृद्ध वाचन संस्कृती याबद्दल आपण नेहमीच खूप अभिमानाने बोलतो. एखादं चांगलं पुस्तक वाचलं की आपण गहिवरतो, लेखकाचं मनापासून कौतुक करतो, सोशल मीडियावर लांबलचक लेख लिहितो आणि अगदी प्रेमाने इतरांनाही ते पुस्तक वाचण्याचा आग्रह करतो. पण, या सगळ्या भावनिक आणि सुंदर वातावरणाच्या पडद्यामागे आज एक असा अमानुष, काळा धंदा उघड्याडोळ्यांनी सुरू आहे, जो थेट लेखकाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करतोय— तो म्हणजे ‘पुस्तकांची पायरसी’ अर्थात डुप्लिकेट छपाई!
अलीकडेच मला याचा एक अत्यंत धक्कादायक, विषण्ण करणारा आणि डोळे उघडणारा अनुभव आला. देवा झिंजाड यांचं बहुचर्चित ‘एक भाकर तीन चुली’ हे ४२५ पानांचं काळीज पिळवटून टाकणारं पुस्तक मी नुकतंच वाचून पूर्ण केलं होतं. त्या पुस्तकाने माझ्या मनावर इतका खोल प्रभाव टाकला होता की, मी अत्यंत भावूक होऊन त्यावर एक सविस्तर लेख लिहिला. तो लेख सोशल मीडियावर पोस्ट करताना पुस्तकाचा फोटोही सोबत जोडला होता.
लेख प्रसिद्ध झाल्यावर थोड्याच वेळात मला प्रत्यक्ष लेखक देवा झिंजाड सरांचा फोन आला. एका साध्या वाचकासाठी आणि लेखकासाठी प्रत्यक्ष पुस्तकाच्या लेखकाचा फोन येणे हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असायला हवा होता. पण सरांचा आवाज ऐकला आणि माझं मन सुन्न झालं. त्यांच्या आवाजात आनंद नव्हता, तर एक प्रचंड खिन्नता, अथांग दुःख आणि वेदना होती. सर अत्यंत नम्रपणे पण तुटलेल्या मनाने मला म्हणाले, “जोतीरामजी, तुम्ही जो लेख लिहिलाय त्याबद्दल मनापासून आभार… तुम्ही पुस्तकाचे भाव खूप सुंदर टिपले आहेत. पण… तुम्ही ज्या पुस्तकाचा फोटो पोस्ट केलाय ना, ती या पुस्तकाची ‘पायरेटेड’ म्हणजेच डुप्लिकेट प्रत आहे!”
ते शब्द कानावर पडताच माझ्या पायाखालची जमीनच घसरली. मला स्वतःची इतकी लाज वाटली की सरांशी पुढे काय बोलावे हेच मला सुचेनासे झाले.
मी ते पुस्तक अॅमेझॉनवरून मागवलं होतं. मला वाटलं होतं की एवढ्या मोठ्या, जगप्रसिद्ध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मागवलंय म्हणजे पुस्तक शंभर टक्के ओरिजनलच असणार. पण आजचं वास्तव अत्यंत भयानक आणि भीषण आहे. फक्त अॅमेझॉनच नाही, तर मीशो, फ्लिपकार्ट यांसारख्या मोठ्या आणि नामांकित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरही असे शेकडो अनधिकृत, चोरटे आणि भामटे सेलर्स बसले आहेत.
हे लोक काय करतात? तर एखाद्या लेखकाने रात्रंदिवस एक करून, स्वतःचं रक्त आटवून लिहिलेल्या पुस्तकाची पीडीएफ चोरतात. मग अत्यंत निकृष्ट, रद्दी कागदावर त्याची धुरकट छपाई करतात, दिसायला हुबेहूब मूळ पुस्तकासारखं वाटणारं डुप्लिकेट पुस्तक छापतात आणि ऑनलाईन ग्राहकांना ओरिजनलच्या नावाखाली किंवा ५०-१०० रुपये स्वस्त देऊन विकतात. आपण वाचक ऑनलाईन स्टार रेटिंग आणि रिव्ह्यू बघून ऑर्डर करतो, पण प्रत्यक्षात आपल्या हातात ती पायरेटेड प्रत टेकवली जाते.
जरा शांतपणे बसून विचार करा मित्रांनो, एका लेखकाने आपल्या आईचं आख्खं आयुष्य, तिचे हाल, तिने पोटाला मारून केलेले कष्ट आणि तिची निष्ठा ४२५ पानांवर उतरवण्यासाठी स्वतःचे कितीतरी महिने, वर्षांतील रात्रीचे डोळे आटवले असतील? त्या पुस्तकाचा मजकूर, त्याची छपाई, त्याचे कव्हर डिझाईन आणि ते पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखकाने स्वतःचं आयुष्य, जमापुंजी आणि वेळ पणाला लावलेला असतो. पण जेव्हा ते पुस्तक बाजारात जातं, तेव्हा त्या पुस्तकाच्या कष्टाचे आणि विक्रीचे हक्काचे पैसे मूळ लेखकाच्या हातात न पडता, ती पायरसी करणारा एखादा दलाल, चोरटा आणि गुन्हेगार स्वतःच्या खिशात घालतो!
ही फक्त ५० किंवा १०० रुपयांची चोरी नाहीये, तर ती एका लेखकाच्या प्रतिभा, मेहनत, घाम आणि स्वाभिमानाची केलेली थेट हत्या आहे. ज्या पुस्तकाचा रस्ता धरून आपण संवेदनशीलतेचे धडे घेतो, त्याच पुस्तकाची चोरी करून विकलेली प्रत आपल्या हातात असावी, यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय? मला स्वतःची प्रचंड चीड आली की, नकळत का होईना, मी एका चोरट्या मार्गाने आलेल्या पुस्तकाचा प्रचार करत होतो. मी तात्काळ देवा सरांची मनापासून माफी मागितली. त्यांना सांगितलं की मला ही प्रत अजिबात नकोय, तुम्ही मला तुमची ओरिजनल प्रत पाठवा. मी तिथेच सरांना ओरिजनल पुस्तकाची रक्कम पाठवली आणि त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने मला त्यांची स्वाक्षरी असलेली ओरिजनल प्रत कुरिअर केली.
हा अनुभव फक्त माझ्यापुरता किंवा देवा झिंजाड यांच्या पुस्तकापुरता मर्यादित नक्कीच नाही. आज मराठी साहित्यातील शेकडो नामांकित, प्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांची अशीच बेकायदेशीर विक्री ऑनलाईन वेबसाईटवर आणि रस्त्यावरील स्टॉल्सवर सर्रास सुरू आहे. विचार करा, एकीकडे मराठी भाषेचा आणि साहित्याचा ढासळता दर्जा म्हणून आपण चिंता व्यक्त करतो, पण दुसरीकडे जे लेखक स्वतःचं आयुष्य साहित्यासाठी पणाला लावतात, त्यांच्या पाठीत आपणच असा पायरसीचा खंजीर उपसणार का?
म्हणूनच, सर्व साहित्यप्रेमी आणि संवेदनशील वाचकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे:
१. ऑनलाईन खरेदी करताना सावध राहा: अॅमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा मीशोवरून पुस्तक मागवताना तो सेलर प्रत्यक्ष ‘लेखक’ किंवा ‘अधिकृत प्रकाशक’ आहे का, हे आवर्जून तपासा. अनधिकृत नाव असलेल्या सेलरकडून खरेदी टाळा.
२. थेट सोर्सचा वापर करा: लेखकांनी किंवा प्रकाशकांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा वेबसाईटवर दिलेल्या थेट लिंक्सवरूनच पुस्तक खरेदी करा. शक्य असल्यास थेट लेखकांशी किंवा प्रकाशकांशी संपर्क साधून पुस्तक मागवा.
३. स्वस्ताच्या मोहात पडू नका: ५०-१०० रुपयांच्या सवलतीसाठी किंवा रस्त्यावर स्वस्त मिळतंय म्हणून पायरेटेड पुस्तक घेऊ नका. कागद विकणाऱ्याला फक्त त्या कागदाची किंमत हवी असते; पण त्या कागदावर उतरलेल्या विचारांची, भावनांची आणि अश्रूंची किंमत फक्त आणि फक्त त्या लेखकालाच ठाऊक असते.
४. नकली पुस्तकांची तक्रार करा: जर तुम्हाला ऑनलाईन मागवलेलं पुस्तक डुप्लिकेट, खराब प्रिंटिंगचं किंवा पायरसी केलेलं आढळलं, तर त्या अॅपवर लगेच तक्रार नोंदवा आणि ते पुस्तक परत करा.
‘एक भाकर तीन चुली’ मधील आयावडेने आयुष्यभर एकच मंत्र जपला आणि आपल्याला शिकवला— “कष्टाला पर्याय एकच… फक्त कष्ट…”
मग विचार करा, कोणाच्यातरी कष्टाची चोरी करून छापलेली पुस्तकं आपल्या घरात आणून आणि ती वाचून आपण कसला विचार-वारसा जपणार आहोत? चला, एक सुजाण, प्रामाणिक आणि जबाबदार वाचक बनूया. पायरसीला आपल्या घरातून आणि समाजातून पूर्णपणे नाकारूया. नेहमी ओरिजनल साहित्यच खरेदी करूया आणि लेखकाच्या घामाचा, कष्टाचा आणि प्रतिभेचा योग्य तो सन्मान करूया!
— जोतीराम बाबु शिंदे