सांगली: येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पारंपरिक ‘गावठी लेझीम’ स्पर्धेत केळेवाडी येथील धनाजीराव शिंदे तरुण मंडळ (DSTM) संचलित विठ्ठल रुक्मिणी लेझीम मंडळाने आपल्या अद्वितीय सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून पुरुष गटात ११ बलाढ्य संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये केळेवाडीच्या संघाने बाजी मारली.
७० वर्षांचे नेतृत्व आणि ५० वर्षांची परंपरा
या विजयाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मंडळाचे अध्यक्ष व वस्ताद विठोबा भाऊ शिंदे. वयाची सत्तरी ओलांडलेली असतानाही, त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला प्रेरणा देणारा होता. आपले गुरु खंडू पाडेकर यांच्याकडून लेझीमचे धडे गिरवलेल्या विठोबा भाऊंनी गेली ५० वर्षे ही संस्कृती जपली आहे. आजही ते स्वतः मैदानात उतरून, शिस्तबद्ध शिट्टी वाजवत संपूर्ण पथकाचे संचलन करतात. त्यांच्या याच अनुभवाच्या आणि शिस्तीच्या जोरावर केळेवाडीच्या संघाने हे मैदान मारले.
वादक आणि सहकाऱ्यांची साथ
विठ्ठल रुक्मिणी मंडळाच्या खेळाडूंनी ढोल, हलगी आणि कैचाळाच्या कडकडाटात ‘गावठी’ लेझीमचे अस्सल प्रकार सादर केले. या पथकाला वादक नामदेव शिऊडकर, पांडुरंग रेपे, विलास पाटील आणि विश्वास शिंदे यांनी आपल्या दमदार वादनाने साथ दिली.
या यशात मंडळाचे सहकारी सुधाकर शिंदे, कृष्णा सुतार, अशोक कदम, बाबू शिंदे, भिकाजी जाधव, बाजीराव शिंदे, साताप्पा शिंदे, बाळू शिंदे, भिकाजी रेडेकर, गुंडु शिंदे, बाबु काशिदकर, दिगंबर नाझरे, बाळु रेपे, दयानंद शिंदे, विजय शिंदे सर आणि शहाजी काशिदकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कलात्मक केळेवाडी’ आणि तरुणाईची जोड
या संपूर्ण यशात उत्तम शिंदे यांच्या ‘कलात्मक केळेवाडी’ या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनेलची भूमिका अत्यंत मोलाची ठरली. या चॅनेलच्या माध्यमातून गावातील पारंपारिक कला जगासमोर नेण्याचे काम प्रभावीपणे केले जात आहे. या कार्यात जीत शिंदे, मोहन शिंदे आणि श्रावण शिंदे या तरुणांनी विशेष मेहनत घेऊन आधुनिक प्रसिद्धी आणि कलेचे सादरीकरण यात मोलाची साथ दिली. वस्ताद विठोबा भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तरुण पिढी पारंपारिक लेझीमचा वारसा सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवत आहे.
कौतुकाचा वर्षाव
स्व. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ११ संघांमधून केळेवाडीचा संघ अव्वल ठरला. या विजयाबद्दल स्पर्धा प्रमुख जीवन कदम, संचालक गौतम पाटील आणि सांगली जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी वस्ताद विठोबा भाऊ शिंदे व त्यांच्या संपूर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.
लेखन: जोतीराम बाबु शिंदे