सोमवारी सकाळी टपाल आले आणि हे पुस्तक हातात पडले. काही दिवसांपूर्वी मी लेखक देवा झिंजाड सर यांचे एक भाकर तीन चुली हे पुस्तक वाचून त्यावर एक लेख लिहुन अभिप्राय मांडला होता. तो अभिप्राय वाचून देवा झिंजाड सरांनीच मला सुचवले होते—”जोतीराम, आता ऐश्वर्य पाटेकर लिखित ‘बाई हरत नसते’ नक्की वाच!” सरांच्या सांगण्यावरून हे पुस्तक मागवले, आणि शेतकर्याचे पोर असल्यामुळे खांद्यावरच्या जुआची अन् संघर्षाची भाषा माझ्या रक्तातच असल्यामुळे मी पुस्तक वाचायला सुरुवात केली, आणि झपाटल्यासारख पुस्तक ४ दिवसात वाचून संपवलं. त्याला कारणही तसंच आहे म्हणा – एकदा सुरवात केली आणि थांबायची इच्छाच होईना.
पण लेखक ऐश्वर्य पाटेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीने उतरवलेले हे पुस्तक हातात घेतले आणि एका वेगळ्याच दुःखाच्या गर्तेत मन अडकत गेले.
ऐश्वर्यजींनी जे काही कागदावर उतरवले आहे, ते निव्वळ शब्द नाहीत तर काळजातून वाहणारे रक्त आहे. त्यांनी मांडलेले वास्तव इतके अथांग आणि विशाल आहे की त्यांच्या या लेखणीला मानाचा मुजरा करावासा वाटतो.
पुस्तकाचा पहिला भाग वाचताना भाषेचा काहीसा अडसर आला, पण त्या शब्दांमागील कळकळ थेट काळजाला भिडत होती. दुसरा भाग सुरू झाला अन् डोळ्यांतील अश्रूंचा असा काही बांध फुटला की पुढे वाचणे कठीण झाले. मी कित्येकदा थांबलो, डोळे पुसले, जरा वेळ शांत बसलो अन् स्वतःला सावरून पुन्हा वाचायला सुरुवात केली.
ईश्वर मामा आणि साऊ मामी यांनी ज्या गुढीपाडव्याच्या पवित्र सणाच्या दिवशी आईला घरातून बाहेर हाकलून दिले, तो प्रसंग वाचताना मन पुरते सुन्न झाले. जगाने आनंदाची गुढी उभारण्याच्या दिवशीच एका माय-लेकराचा निवारा हिरावून घेतला जावा? त्या सणाच्या दिवशी त्या माऊलीच्या पायाखालील जमीनच सरकली असेल.
त्यात भर म्हणजे आजोबा, वडील, आत्या अन् मामा या सगळ्या रक्ताच्या माणसांनी मिळून जेव्हा त्या आईला अमानुषपणे झोडपायला सुरुवात केली, तेव्हा त्या मारहाणीत तिच्या डोक्याचे केस मुळापासून उपटून हातात आले… तो प्रसंग वाचताना माझ्या छातीवर दगड ठेवल्यासारखे दडपण आले. चार-चार दिवस स्वतःचे रक्ताचे पाणी करून, उरस्फोड कष्ट करून बांधलेले ते छोटेसे मातीचे घर एका क्षणात जमिनीदोस्त केले गेले. भिंती पडत नव्हत्या, तर एका आईची उरलीसुरली स्वप्ने मातीत मिळवली जात होती.
कांद्याच्या मळ्यावर राबणाऱ्या त्या आईला मध्यरात्री १२ वाजता भुकेल्या लेकराची आठवण झाली, तेव्हा ती भयाण अंधारात रस्ता शोधत निघाली. पण त्याआधी, एका चांभारणीने जेव्हा स्वतःच्या अंगावरचे दूध पाजून त्या तान्ह्या बाळाची भूक भागवली, तेव्हा डोळ्यातून आपसूक पाण्याचा लोट वाहू लागला. माणसातील देवमाणसाचे ते रूप अश्रू थांबवू देत नव्हते.
लहानग्या भावड्या अन् त्याच्या बहिणींचा जीव ज्याच्यात अडकला होता, तो त्यांचा लाडका ‘सोन्या’ बोकड… बापाने दुसऱ्या बायकोच्या लेकराचा नवस फेडण्यासाठी क्रूरपणे फरफटत ओढून नेला. तो बोकड वाचवण्यासाठी त्या निष्पाप भावंडांनी केलेला आक्रोश काळजाचे तुकडे तुकडे करून जातो.
त्यात पुन्हा आईने जिवापाड जपलेली शेळी मोकाट कुत्र्यांनी फाडून खाणे… अभावाने ग्रासलेल्या त्या संसारातील आधाराचा एक-एक धागा असा तुटताना पाहून मन आक्रोशाने भरून येत होते.
पण सर्वात भयंकर वेदना झाली ती कोर्टातील प्रसंगाने! ज्या बापाच्या नावाने मूल ओळखले जाते, तोच बाप जेव्हा कोर्टात उभा राहून स्वतःच्याच रक्ताकडे बघून थंडपणे सांगतो, “हा माझा मुलगा नाहीच!” तेव्हा त्या आईच्या काळजातून काय किंकाळी बाहेर पडली असेल? तिच्या मातृत्वावर आणि चारित्र्यावर उठवलेला तो प्रश्न कुठल्याही तलवारीच्या वारापेक्षा खोल होता.
हे पुस्तक वाचताना मला माझ्या लहानपणाच्या आठवणी अन् माझ्या आईचा आणि बाबांचा अथांग संघर्ष डोळ्यांसमोर जिवंत झाला. अभावातही तिने आणि बाबांनी आम्हाला जपण्यासाठी सोसलेल्या या वेदना मनात जाग्या झाल्या. मी लगेच माझ्या बायकोला अन् भावाला सांगितले—”कायही करा, पण वेळ काढून हे पुस्तक आधी वाचून काढा.” सर्व काही उद्ध्वस्त होऊनही, अपमान नि अन्याय पचवून पुन्हा उभी राहणारी ही आई सिद्ध करते की, ‘बाई खरोखरच कधी हरत नसते.’
मनाला हेलावून टाकणारे हे अमूल्य पुस्तक वाचायला सुचवल्याबद्दल देवा झिंजाड सर यांचे विशेष आभार, आणि एवढी महान कलाकृती निर्माण केल्याबद्दल लेखक ऐश्वर्य पाटेकर यांना मनापासून धन्यवाद!
– जोतीराम बाबु शिंदे
मोबाईल: ८८९८९५५५९३
