जोतीराम शिंदे यांनी लिहिलेल्या “चिखल संघर्षाच्या पाऊलखुणा” या पुस्तकाचे नुकतेच वाचन पूर्ण केल़े.पुस्तक हातात घेतल्यापासून वाचून संपेपर्यंत हातातून ठेवू वाटेना. शिवारबा प्रकाशनचे हे नवे पुस्तक नुकतेच हातात आले.लगेचच वाचून पूर्ण केले.भुदरगड तालुक्यातील डोंगर कपारीत वसलेल्या केळेवाडी ता.भुदरगड या गावचे लेखक जोतिराम शिंदे यांनी लिहिलेले हे पहिले पुस्तक. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभालाही जाण्याचा योग आला .या पुस्तकातील सर्वच पात्रे आम्ही पाहिलेली आहेत. हा परिसर अनुभवलेला आहे.या परिसरातील पायवाटेने भ्रमंती केली आहे.त्यामुळे हे पुस्तक वाचण्याची खूपच आतुरता होती. ग्रामीण भागात जन्मलेली गरिबीचे चटके खाणारी शिक्षणासाठी हालापेष्ठा सोसणारी एक पिढी या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. प्रतिकूल परिस्थितीत जगताना संघर्षातून यशाच्या शिखरापर्यंत पोचलेल्या यशस्वी माणसांची ही कहाणी आहे. हे व्यक्तिचित्र संग्रह वाचताना डोळे भरून येतात. लेखकाने वास्तव लेखन केले आहे. चिखल संघर्षाच्या पाऊलखुणा मांडताना एक दुर्लक्षित दुर्गम गाव आपल्या नजरेसमोर उभे राहते .या पुस्तकातील प्रत्येक पानावर संघर्ष करणारी माणसे चित्रीत झाली आहेत. अनेक पत्रांचे जगण्यातील चढ-उतार या पुस्तकात वाचायला मिळतात. माणूस जरी खेड्यात राहत असला, फाटक्या कपड्यातील असला तरी त्याने माणुसकी जपलेली असते .ही शिकवणूक या वाचनातून मिळाली .चिखल म्हणजे आलेल्या परिस्थितीला न डगमगता अत्यंत प्रयत्नपूर्वक यशाच्या शिखरापर्यंत जिद्दीने वाटचाल करणे होय. ‘चिखल संघर्षाच्या पाऊलखुणा ‘हे शीर्षक वाचकाला पुस्तक वाचण्याची ओढ निर्माण करते .पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील एका पायात एक चप्पल दुसऱ्या पायात दुसरेच चप्पल हे बोलके चित्र वाचकांना पुस्तकात कोणता मजकूर असेल याची हलकीशी जाणीव करून देते. जोतिराम शिंदे यांचा जन्म एका जंगलाने वेढलेल्या छोट्याशा वाडी वस्तीवरचा. पाचवी पासून पायपीट करीत दिंडेवाडी सारख्या गावाला दररोज जाणे- येणे. शिक्षण घेताना पुढचे काहीच माहिती नाही. मात्र अभ्यास, चिकाटी, मेहनत ,प्रामाणिकपणा, जिद्द याच्या जोरावर लेखक यशो शिखरावर विराजमान झाले आहेत. ज्या वाडीवस्तीत पदवीधर युवक असणे ही दुर्मिळ गोष्ट असते त्या केळेवाडी गावाने आज पर्यंत डझनभर पदवीधारक इंजिनियर बनवले आहेत. शिंदे यांच्या या व्यक्तिचित्रण संग्रहातून आलेली सर्वच पात्रे संघर्षाचा प्रवास करणारी आहेत .कोणी चांगला गोठा तयार करतो. तर कोण चिखलातूनच गगन भरारी घेतो .केळेवाडी आणि दिंडेवाडी परिसरातील लोकजीवन या पुस्तकात लेखकाने अत्यंत उत्कृष्टपणे मांडले आहे. दिंडेवाडी येथील युवक कार्यकर्ते दयानंद भोईटे यांचा जिओ स्टार पर्यंतचा संघर्षमय प्रवास युवकांना प्रेरणादायक वाटतो. केळेवाडी चा सागर पुत्र आणि त्यांनी दिलेली एकाकी झुंज वाचकांना मोठी प्रेरणा देऊन जाते. खेड्यातलाच मुलगा सी.ए. कसा होतो किंवा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा मुलगा सिईटी चा टॉपर होतो. यासारख्या अनेक यशस्वी कथा लेखकाने रंजकपणे मांडलेल्या आहेत .गावात पूरक व्यवसाय म्हणून चांगला दुधाचा गोठा उभा करुन या दुधाच्या उत्पन्नातून कुटुंबाला चांगले दिवस आणण्यासाठी धडपडणारा शेतकरी या पुस्तकात चित्रित झाला आहे. केळेवाडी हे जेमतेम 300 लोक वस्तीचं चिमुकलं गाव. पूर्वी या गावाला एस.टी.ची सुद्धा सुविधा नव्हती. गावात केवळ चौथीपर्यंत शाळा. अलीकडच्या काळात चांगले रस्ते झालेत .एस.टी. बसचा प्रवास सुरू झालाय .काळ बदललाय. मात्र लेखकाने ज्या काळात संघर्ष केला तो काळ अत्यंत प्रतिकूल होता .अशा काळातही न डगमगता लेखकाने संघर्षाचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. चिखल संघर्षाच्या पाऊलखुणा हे पुस्तक वाचताना ग्रामीण भागातील युवक सुद्धा येशो शिखरापर्यंत निश्चित पोहचू शकतात हा आत्मविश्वास लेखकाने वाचकांना दिला आहे. या पुस्तकाचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत माणसे किती निकराने संघर्ष करतात आणि त्यांची संघर्षमय कहाणीकशी यशापर्यंत पोहोचते याचे दाखलेच पानापानावर लेखकाने दिले आहेत. लेखक जरी आय.टी .फिल्डमध्ये स्थिर असले तरी गावाबद्दलची, माती बद्दलची त्यांची ओढ सतत टिकून आहे. लेखक आज जरी मोठ्या शहरात स्थिरावले असले तरी त्यांना गाव मातीची आणि गावातील पायवाटेच्या चिखलाची सदैव ओळख स्मरणात आहे. लेखकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे समूहभाव. आपल्या गावातील लेझीम कलेचा सर्वदूर प्रचार व्हावा यासाठी लेखकाने पुस्तकातून वर्णन तरी केलेच आहे याशिवाय सोशल मीडिया वरून गावातील लेझीम पथकाला कायमपणे चित्रात ठेवले आहे. यामुळे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केळेवाडी या गावाची ओळख लेझीम खेळणाऱ्यांचे गाव अशी झाली आहे .लेखक जोतिराम शिंदे यांच्या या लेखन प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा! पुढील साहित्यकृती लवकरच वाचकांच्या हाती येईल हा विश्वास वाटतो.वाचक या पुस्तकाचे स्वागत आत्मियतेने करतील याची खात्री आहे.पुढील लेखन प्रवासाला शुभेच्छा!
संजय तुकाराम खोचारे(प्रसिद्ध कवी व बालसाहित्यिक, भुदरगड – कोल्हापूर)प्रमुख पुरस्कार: द. म. साहित्य सभा विशेष काव्य पुरस्कार, वेदसागर व सोलापुरे बालसाहित्य पुरस्कार, डॉ. न. ना. देशपांडे साहित्य पुरस्कार, मायबोली सद्भावना पुरस्कार व आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्तसंपर्क: ७७६७८१५२७७ / ९४२०७७६०१७
